पोलिसांचे काम नवापुरकरांनीच केले; दोन चोरांना दुचाकी चोरताना रंगेहात पकडून केले पोलिसांच्या हवाली
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोर्यांनी कळस गाठला असताना या दुचाकी चोरट्यांना पडकण्यात पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. अशा वेळी नवापुरात मात्र वेगळीच बातमी समोर आली आहे. येथे दोन दुचाकी चोरांना स्थानिक रहिवाशांनीच रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही चोर गुजरातेतील असून, महाराष्ट्रात येवून दुचाकी चोरल्यावर त्याचे सुटे भाग करून त्याची विक्री करीत असल्याचे समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरात गुरुवारी (दि. ४) रात्री ही घटना घडली. अंकित वेच्या कोकणी (२६) आणि नितेश राजेंद्र कोकणी (२१, दोघेही रा. सुंदरपूर, ता. उच्चल, गुजरात) अशी या दोन्ही दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अंकित व नितेश हे दोघेही जनता पार्क-शास्त्रीनगर परिसरातील नाना-नानी पार्कजवळ संशयास्पदरित्या फिरत होते. याच दरम्यान त्यांनी समद पठाण यांच्या मालकीची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या दुर्दैवाने ही बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने या दोघांचाही पाठलाग सुरू केला.
चोरटे पुढे अन् स्थानिक रहिवाशी मागे असा खेळ बराच सुरू राहिला. अखेर काही अंतरावर स्थानिकांनी हिंमत करून या दोघांनाही घेराव घालून ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पकडून नवापूर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले. तेथे समद पठाण यांनी या दोघांविरोधात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दुसर्या दिवशी या दोघांनाही न्यायालयापुढे उभे करण्यात आले.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी दाखवलेल्या या धाडसाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले. आता या दोघांनाच्या अटकेमुळे शहर व परिसरातील अनेक दुचाकी चोरी, घरफोड्या, मंदिरांतील चोर्या याबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



