महाराष्ट्र

धडगावच्या काकडदा परिसरात मध्यरात्री भीषण वणवा; सागवानाची शेकडो झाडे जळून खाक, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलात मध्यरात्री भीषण वणवा लागल्याने वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत शेकडो सागवानाची मौल्यवान झाडे जळून खाक झाली असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी भयावह वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि वनसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास जंगलातील एका भागात आग लागली आणि काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केले. उन्हाळ्याची तीव्र उष्णता आणि कोरड्या पडलेल्या वनस्पतींमुळे आग वेगाने पसरत गेली. अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या वणव्यात मोठ्या प्रमाणावर सागवानसह विविध वनस्पती जळून गेल्या. आगीची तीव्रता इतकी होती की दूरवरूनही ज्वाळा आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.
सातपुड्यात वणव्याच्या घटनांत चिंताजनक वाढ
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. धडगाव, अक्कलकुवा व परिसरातील विविध वनक्षेत्रांत आगीच्या घटनांमुळे हजारो हेक्टर जंगल प्रभावित झाल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा स्‍थानिकांचा आरोप आहे. वनतज्ज्ञांच्या मते, सातत्याने लागणाऱ्या आगींमुळे जंगलातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधी वनसंपत्ती आणि नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आली आहे.
वन्यजीवांच्या अस्तित्वापुढे संकट
वणव्यामुळे जंगलातील वन्यजीवांचे जीवनही धोक्यात आले आहे. ससा, मोर, रानकोंबडा, साळींदर, सरपटणारे प्राणी तसेच विविध पक्ष्यांच्या अधिवासाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक प्राणी आगीपासून बचावासाठी जंगलाबाहेर येत असल्याने त्यांचा मानवी वस्त्यांकडे कल वाढत आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
सातपुडा हा जैवविविधतेचा महत्त्वाचा पट्टा असून, येथे होणारे वनविनाशाचे प्रकार भविष्यात पर्यावरणीय असंतुलन निर्माण करू शकतात. जंगलातील वृक्षसंपदा नष्ट झाल्याने पावसाचे प्रमाण, भूजल पातळी आणि स्थानिक हवामानावरही परिणाम होऊ शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे म्‍हणणे आहे.
वन विभागाच्या भूमिकेवर टीका
जंगलात वारंवार लागणार्‍या आगी रोखण्यासाठी, त्‍या वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाकडून अपेक्षित पातळीवर प्रयत्न होत नसल्याचा आरोप स्थानिकांसह निसर्गप्रेमींकडून केला जात आहे. अनेकदा आग लागल्यानंतर बराच वेळ उलटल्यानंतरच यंत्रणा घटनास्थळी पोहोचत असल्याची तक्रार स्‍थानिकांनी केली.
वाढत्‍या वणव्यामुळे वन विभागाने संवेदनशील भागांत विशेष पथके तैनात करावीत, जंगल परिसरात नियमित गस्त वाढवावी, स्थानिकांच्‍या मदतीने वनसंरक्षण समित्या सक्रिय कराव्यात आणि आगीची कारणे शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या भीषण वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आगीमागील कारणांचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button