फास्टफूडला रामराम, घरच्या जेवणाला सलाम – शहादा शिबिरात आहार तज्ज्ञ प्रा. डी.सी. पाटील यांचा आरोग्यमंत्र!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) योग आणि संतुलित आहार यांची सांगड हेच निरोगी आयुष्याचे प्रमुख साधन आहे. घरच्या किचनमधील पारंपरिक भारतीय अन्नपदार्थांचा योग्य वापर केल्यास आरोग्य उत्तम राहते आणि योगाभ्यास त्याला अधिक बळ देतो. डायनिंग संस्कृतीऐवजी भारतीय भोजन पद्धती अवलंबणे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ प्रा. डी. सी. पाटील यांनी केले.
शहादा येथील स्वामी समर्थ केंद्रात पतंजली योग समितीतर्फे सुरू असलेल्या ‘योग प्राणायाम शिक्षक प्रशिक्षण शिबिरा’त प्रा. पाटील बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख भरत पाटील, योगशिक्षक कैलास भावसार, किशोर चौधरी, मुकेश राजपूत व कार्य समन्वयक अभियंता प्रकाश पाटील उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाले, “पाश्चात्य भोजन संस्कृती, फास्टफूड व जंकफूडमधील रासायनिक घटक आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे हृदयरोगासह गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणून ‘होम किचन इज ऑलवेज बेस्ट देन हॉटेल किचन’ हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे. घरचे अन्न आयुर्मान वाढवते आणि निरोगी जीवन देते.”
शिबिरात योगशिक्षक किशोर चौधरी, कैलास भावसार व मुकेश राजपूत यांनी प्रशिक्षणार्थींना योगासंबंधी मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बागुल, शरदभाई पाटील, प्रवीण सोनार, किरण जाधव आदींनी परिश्रम घेतले. या शिबिराला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.



