चिंचपाडा वनक्षेत्रात सागवानासह इतर वृक्षांची कत्तल; वनविभागाचे मात्र साफ दुर्लक्ष, स्थानिकांसह वन्यप्रेमींमध्ये संताप

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वृक्षांची, विशेषतः सागवानाची सर्रास कत्तल केली जात आहे. यातून पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत असूनही या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचपाडा वनक्षेत्रात सध्या शेकडो वनसंपदेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. जंगलातील मौल्यवान सागवान झाडे तोडून त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. यामुळे एकेकाळी हिरवीगार असणारी चिंचपाड्याची जंगले आता हळूहळू बोडखी होऊ लागली आहेत. निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ट होत आल्याने स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे.
कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या देऊळचा समोरील भागात नाला ओलांडून ही तोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात सागवानाच्या झाडांचा मोठा समावेश आहे. मौल्यवान सागवानी झाडांची तूट कोणी व कशासाठी केली याची चौकशी करून संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमीकडून केली जात आहे.
जंगलांचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत. या तस्करांना स्थानिक पातळीवरून वरदहस्त लाभल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वन तस्कर गब्बर होण्यामागे वनविभागाच्याच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी उघड चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
या वनतस्करी संदर्भात सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध होत असूनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी ठोस कारवाई करायला धजावत नाहीत. कारवाई न करण्यामागचे ‘अर्थपूर्ण’ कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे कार्यक्रम साजरे करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःच्याच नाकाखाली चाललेली ही जंगलांची कत्तल दिसत नाही का, असा संतप्त प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
आता तरी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चिंचपाडा आणि नवापूर परिसरातील सागवान तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करणार की तस्करांना असेच अभय देऊन जंगलांचा सफाया होऊ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचपाडा वनक्षेत्रामध्ये वनविभाग चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आहे. वेळोवेळी पेट्रोलिंग केली जाते. वनविभागाचे अधिकारी जंगलात नेहमी गस्त घालतात. जंगलात झाडांची तोड झाली आहे, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. जंगलात वृक्षाची अवैध कत्तल करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– प्राशा पगारे, वनक्षेत्रपाल, चिंचपाडा



