शाळा इमारती दुरूस्त होईनात; शहाद्यातील राजकारण्यांनो जनाची नाही तर मनाची तरी .. बाळगा!

रोखठोक / भालचंद्र पिंपळवाडकर
शहाद्यातील मराठी आणि उर्दु माध्यमांच्या मिळून एकूण सहा शाळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या शाळांच्या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतील, अशी स्थिती आहे. असे असताना शहाद्याच्या नगर परिषदेचे पदाधिकारी मात्र राजकारणाच्या माध्यमातून परस्परांवर कुरघोडी करण्यात मश्गुल आहेत. याचे कारण या पदाधिकार्यांच्या दूरदूरपर्यंतच्या नातेवाईकांपैकी कुणाचेही मुलं-मुली या शाळांत शिकत नाहीत. त्यामुळे या शाळांच्या इमारती दुरूस्त झाल्या किंवा नाही झाल्या, याच्याशी जणू आपले देणेघेणे नाही, अशा भूमिकेत न.प.चे पदाधिकारी असलेले राजकारणी दिसत आहेत. प्रशासनाच्या उरावर बसून त्यांच्याकडून या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती करून घेण्याची धमक शहाद्यातील राजकारण्यांमध्ये नाही, हेच स्पष्ट होत आहे.
दोन दिवसांपूर्वी शहादा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील जीर्ण झालेल्या मराठी आणि उर्दू शाळांच्या इमारत दुरूस्तीचा विषय मुनेश जगदेव यांनी मांडला खरा. पण त्यावर सभेत काय निर्णय झाला, हे या सभेच्या वृत्तांकनातून कुठेही बाहेर आला नाही. नगरसेवकांनी विषय मांडायचा, त्यावर सगळ्यांनी मम म्हटल्याप्रमाणे हो ला हो लावायचे अन् पुढे चालायचे, असे प्रकार नगर परिषदांच्या सभांतून सुरू आहेत. न.प.च्या सभेत झालेल्या विषयांचे आणि त्यावरील निर्णयांचे पुढे काय झाले यावर पुढे ना न.प.चे पदाधिक़ारी बोलतात ना शहादेकर जनता त्याचा आढावा घेते.
खरं सांगायचं तर शहाद्याची नगर पालिका म्हणजे केवळ राजकारणाचा आखाडा होवून बसली आहे. नगराध्यक्ष एका पक्षाचे, उपनगराध्यक्ष सर्वाधिक सदस्य असलेल्या दुसर्या पक्षाचे अन् सभापती देखील याच पक्षाचे अशी सगळी खिचडी होऊन बसल्याचे चित्र आहे. यातून प्रशासनावर कोणाचाही वचक निर्माण होऊ शकलेला नाही आणि याचा गैरफायदा घेत प्रशासन शहराच्या विकासाच्या मुद्यावर कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. याचा त्रास अवघ्या शहादावासीयांना होतोय, याकडे कुणीही लक्ष देत नाही. राजकारणी अर्थात नगर परिषदेचे पदाधिकारी परस्परांशी झुंजत बसले आहेत आणि त्यांच्या झुंजीकडे पाहत शहरातील कामांकडे दूर्लक्ष करीत प्रशासन मजा मारताहेत, अशी दुर्दैवी वेळ शहादेकरांवर येऊन ठेपली आहे. गेल्या सहा वर्षांपासून या शाळांच्या इमारतींच्या दुरूस्तीसाठी संबंधित शाळा प्रशासनांनी नगर परिषदेच्या प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन याबाबत निर्णय घेण्यासाठी उत्सुक दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे या प्रशासनाकडून काम करून घेण्याची जबाबदारी असलेले राजकारणी आणि नगर परिषदांचे पदाधिकारी न.प.च्या बैठकांत या विषयावर निर्णय घेऊन प्रशासनाला ही कामे करण्यास भाग पाडण्याऐवजी राजकारण करून परस्परांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानत आहेत. ही सारी परिस्थिती प्रशासनाच्या पथ्यावर पडत असून, त्यामुळेच गेल्या सहा वर्षांपासून नगर परिषदेच्या जीर्णावस्था झालेल्या मराठी व उर्दू शाळांची दुरूस्ती होऊ शकलेली नाही. शहाराच्या कुकडेल भागातील साळी गल्लीतील शाळा क्रमांक तीनची दोन मजली इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती आहे. छताला गळती लागली आहे. छताचे प्लास्टर निघाल्याने पावसाचे पाणी मुरून भिंती व जमीन ओलावून जाते. या पाण्यात राहून पोषण आहाराचे कडधान्य फेकून द्यायची वेळ शाळा प्रशासनावर येते. ओठाला न पोटाला अशी या अन्नाची अवस्था होत असल्याने शासनाचेही नुकसान होते. पण याची नगर परिषदेच्या प्रशासनाला आणि तेथे राज्य करणार्या पदाधिकार्यांना काहीही पडलेले नाही. ज्यांच्या आई-बापाने मतांचे भरघोस दान पदरात टाकून आपल्याला त्यांच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी निवडून दिले, त्याचाच विसर नगर परिषदेत विविध पदे भूषविणार्या राजकारण्यांना पडला आहे, हे इथे नाईलाजाने नमूद करावे वाटते. ही वाक्ये सदरील नगर परिषदेची खूर्ची उचवणार्या राजकारण्यांना वाईट वाटणारी ठरणार असली तरी हेच वास्तव असल्याचे त्यांनाही माहिती आहे. तसे नसते तर गेल्या सहा वर्षांत (२०२१ ते २०२६) सात वेळा नगर परिषदेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना शाळा दुरूस्तीचा प्रस्ताव मिळूनही या शाळा दुरूस्त न झाल्याचा राग या राजकीय पदाधिकार्यांना आला असता. महत्वाचे म्हणजे केवळ शाळा प्रशासनांनीच नव्हे तर तज्ज्ञांनीही या शाळा धोकादायक परिस्थितीत असल्याचे अहवाल दिलेले आहेत. २०२३ आणि २०२४ असे सलग दोन वर्षे वेगवेगळ्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शाळा क्र. तीनची इमारत पाडून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता. इतर शाळांच्या बाबतीतही असेच वेगवेगळे सल्ले देण्यात येऊनही न.प. प्रशासन आणि त्यांच्यावर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेले पदाधिकारीरूपी राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करीत असतील तर ते शहादावासीयांचे आणि या शहराचे भवितव्य असलेल्या भावी पिढी अर्थात आज जीव मुठीत धरून कोणत्याही क्षणी कोसळतील अशा शाळांत शिकणार्या चिमुकल्यांचे दुर्दैव आहे, असेच म्हणावे लागेल.
परस्परांतील हेवेदावे, पदांसाठी सुरू असलेले राजकारण बाजूला ठेवून शहाद्यातील राजकारणी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच कोणत्याही क्षणी कोसळतील अशा शाळांच्या इमारत दुरूस्तीसाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा शहादावासीयांना आहे. यासाठीची सद्बुद्धी शहाद्यातील पदे भूषविणार्या सर्वच राजकारण्यांना मिळावी, हीच नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आराध्य देवतांची चरणी प्रार्थना. यासाठी भलेही नगर परिषदेचा कारभार हाकणार्या राजकीय पदाधिकार्यांनी केवळ शाळांच्या दुरूस्तीचा हा विषय मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेची विशेष सभा बोलावण्याची हिंमत दाखवावी आणि विरोधकांनीही तेवढ्याच तन्मयतेने त्याला साथ द्यावी, हीच अपेक्षा. आणि हे आताच घडले नाही तर सध्याचीच नव्हे तर येथून पुढील कोणतीही पिढी या राजकारण्यांना कधीच माफ करणार नाही, हे मात्र खरे…



