राजकारण

तळोदा न.प.चे कर्मचारी राजकारण्‍यांचे घरगडी नाहीत; नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी भडकल्‍या; म्हणाल्‍या, चुकीच्‍या परंपरा यापुढे बंद, आता फक्‍त नियमानुसारच होईल काम…

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मी सांगेल तसेच आणि तेच काम नगर परिषदेचे काम होईल, अशी आजवर सुरू असलेली परंपरा आता बंद झाली आहे. नगर परिषदेचे कर्मचारी शहरातील कोणत्‍याही राजकारणी नेत्‍याचे घरगडी नाहीत. यापुढे केवळ आणि केवळ नियमानुसारच नगर परिषदेचे कर्मचारी काम करतील, अशा शब्‍दांत तळोदाच्‍या नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
तळोदा नगर परिषदेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या सर्वसाधारण सभेत शहरातील स्‍वच्‍छतेच्‍या मुद्द्यावरून विरोधी बाकावरील सदस्‍यांनी सत्ताधार्‍यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला होता. सदस्‍य व पदाधिकार्‍यांनी सांगूनही न.प.च्‍या स्‍वच्‍छता विभागाचे कर्मचारी शहरात स्‍वच्‍छता करीत नसल्‍याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्‍यावेळीही नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी यांनी खासगी जागांवरील नव्‍हे तर केवळ सार्वजनिक जागा स्‍वच्‍छ करण्‍याची न.प. कर्मचार्‍यांची जबाबदारी असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते.
यानंतर पुन्‍हा नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी व राष्‍ट्रवादी काँग्रेसचे पॅनलप्रमुख योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. यावेळी त्‍या म्‍हणाल्‍या, नगर परिषदेत आजवर सुरू असलेल्‍या परंपरा आम्‍ही बंद केल्‍याने अनेकांना पोटशूळ उठला आहे. चुकीच्‍या सवयींना खोडा बसल्‍याने विरोधकांना त्रास होत असला तरी त्‍यातून तळोद्याच्‍या जनतेला न्‍याय मिळतोय, हे महत्त्‍वाचे आहे. नगर पालिकेचे कर्मचारी जनतेच्‍या सेवेसाठी असून, यापुढे ते कोणत्‍याही राजकारण्‍याचे घरगडी म्‍हणून काम करणार नाहीत. नगर परिषदेचे कर्मचारी यापुढे केवळ शहरवासीयांना बांधील राहून काम करतील.
विरोधक केवळ काही तरी मुद्दे काढून राजकारण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांनी सर्वसाधारण सभेपूर्वी भेटून वैयक्‍तिक समस्‍या मांडायला हव्‍या होत्‍या. तसे न करता हा मुद्ददा सर्वसाधारण सभेत मांडण्‍यात आला. यामागे केवळ वातावरण तापविण्‍याचा विरोधकांचा उद्देश होता. आम्‍ही करीत असलेल्‍या विकास कामांमुळे विरोधकांच्‍या पोटात दुखत आहे. त्‍यामुळेच ते खोटे बोलून शहरवासीयांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत, असा आरोपही यावेळी चौधरी यांनी केला.
यावेळी उपनगराध्‍यक्षा शीतल पाडवी, राष्‍ट्रवादीचे गटनेते कल्‍पेश चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अरविंद प्रधान, इम्रान खाटीक, गायत्री पिंपरे, प्रतिभा पाडवी, मीराबाई कोळी, लक्ष्‍मी नाईक, हर्षा पाडवी यांची उपस्‍थिती होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button