देशी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करा, गोरक्षणाच्या नावाखालील दहशत थांबवा; एजाज बागवान यांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करून तिच्या संवर्धनासाठी विशेष कायदे व योजना राबवाव्यात, तसेच गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
हिंदू धर्मात गायीला ‘गोमाता’ म्हणून विशेष मान आहे. शेती व्यवस्थेत देशी गायीचे योगदान महत्त्वपूर्ण असून शेणखत, गोमूत्र, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत तिची मोठी भूमिका आहे. गाईचे संवर्धन झाल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल तसेच शेतकरी व पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच गोरक्षणाच्या नावाखाली काही तथाकथित संघटना व समाजकंटकांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची वाहने अडविणे, जनावरे हिसकावून घेणे, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, मारहाण तसेच मॉब लिंचिंगसारख्या गंभीर घटना घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
देशातील सामाजिक व जातीय सलोखा बिघडविणाऱ्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जमाते उलेमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना जकरीया, सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. मजहर शेख, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस दत्तूभाऊ पवार, मन्यार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासीर मन्यार, जावीद शेख, इमरान मन्यार, प्रताप सोनवणे, पांडुरंग गवळी, छोटू पवार, अर्जुन मालवे, ओम पुरी आदी उपस्थित होते.



