मुख्य बातम्या

प्रेमसंबंधांतून जन्‍मलेले मुल थेट कचर्‍यात फेकले; सीसीटीव्‍हीमुळे झाला पर्दाफाश; शहाद्याच्‍या १९ वर्षीय तरुणीला गुजरातेत उधना पोलिसांकडून बेड्या!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘माता न तू वैरिणी’ ही उक्‍ती खरी करून दाखवणार्‍या शहाद्याच्‍या तरुणीला अखेर गुजरातेतील सुरत शहरातील उधना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. उधना परिसरात मानवतेला हादरवून टाकणारे कृत्‍य करताना प्रेमप्रकरणातून गर्भ राहिलेल्‍या या तरुणीने बेकायदेशीर गर्भपात करून भ्रूण कचऱ्यात फेकून दिले होते. मात्र, हे कृत्‍य करताना ती तरुणी सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात कैद झाली आणि पोलिसांनी तांत्रिक तपासाच्‍या आधारे अवघ्‍या काही तासांत तिच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उधना येथील भीमनगर परिसरातील गटाराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेतील भ्रूण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक रहिवाशांनी याबाबत माहिती दिल्यानंतर उधना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात संबंधित भ्रूण कचऱ्यात टाकण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला आग लावल्यामुळे भ्रूणही जळाल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका तरुणीची संशयास्पद हालचाल निदर्शनास आली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन चौकशी केली असता तिने जळालेला भ्रूण स्वतःचाच असल्याची कबुली दिली.
आरोपी तरुणी ही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी असून, तिचे ईश्वर नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. यातून त्‍यांच्‍यात शारीरिक जवळीक निर्माण होवून त्‍यातून ती गर्भवती राहिली होती. यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीने त्‍या दोघांनी युवतीची गर्भधारणा लपविण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप असून, त्यानंतर ती सुरतमधील नातेवाईकांकडे आली. तेथे गोळ्या घेतल्यानंतर गर्भपात झाला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने भ्रूण कचऱ्यात फेकून देण्यात आला, असे आतापर्यंतच्‍या तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी उधना पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तसेच गर्भपातासाठी गोळ्या पुरविल्याचा आरोप असलेल्या ईश्वर या युवकाचा शोध सुरू असून, प्रकरणाचा अधिक तपास उधना पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बेकायदेशीर गर्भपात, सामाजिक दबाव आणि तरुणांमधील वाढत्या बेफिकीर संबंधांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button