नंदुरबार जिल्हा

आज आनंदी आनंद झाला, कारण पाणी आले नळाला : सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावरील रहिवाशांसाठी ऐतिहासिक क्षण; स्‍वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच मिळाले नळाचे पाणी!

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘धरण उशाला अन् कोरड घशाला” अशी अवस्‍था असलेल्‍या धडगाव तालुक्‍यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम सादरी पाड्यावर स्‍वातंत्र्यांनंतर पहिल्‍यांदाच नळांना पाणी आले आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या या पाडावासीयांच्‍या आयुष्‍यात हा ऐतिहासिक क्षण आल्‍याने त्‍यांच्‍या आनंदाला पारावर उरला नसल्‍याचे चित्र पाहायला मिळाले.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सादरी परिसरातील पाड्यांवरील रहिवाशांच्‍या पिढ्यान्‌ पिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी झुंज देत संपल्‍या. दुर्गम डोंगररांगा, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे येथील रहिवाशांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. या पाडावासीयांचे पाण्‍यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेले हाल पाहून, अखेर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला.
गंगा आली हो अंगणी…
यंग व डीजेड या दोन्‍ही फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून सुरुवातीला विहीर खोदून पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यातून अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाच्या सहाय्याने पाणी उचलून सादरी पाड्यावर पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातून तब्बल सात ते आठ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली. यासाठी आवश्यक साहित्य होडीच्या साहाय्याने नदीमार्गे नेऊन काम पूर्ण करण्यात आले.
अखेर नळातून पाणी वाहू लागल्याचा क्षण ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरला. नळ सुरू होताच चिमुकल्यांनी आनंदाने नळाखाली भिजत जल्लोष केला, तर अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. वर्षानुवर्षांची पाण्याची समस्या दूर झाल्याने संपूर्ण पाड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत बोलताना डीजेड फाउंडेशनचे दिलीप जैन म्‍हणाले, दुर्गम आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शासनाने अशा वंचित भागांमध्ये अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज असून पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यांसारख्या सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
यंग फाउंडेशनचे संदीप देवरे यांनीही या उपक्रमामागील प्रयत्नांची माहिती देत, समाजाच्या सहकार्याने अशक्य वाटणारी कामेही शक्य होतात, असा विश्वास व्यक्त केला. सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर पोहोचलेले हे नळाचे पाणी केवळ तहान भागवणारे नाही, तर विकासाच्या नव्या आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा प्रवाह ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button