रोखठोक

शहाद्याच्‍या तहसीलदारांची बातच न्‍यारी; सरकारी गाडी कुटुंबासह करतेय किराणा दुकानाची वारी!; सरकारी वाहनाच्या कथित गैरवापराची चर्चा; ‘महसूल’च्‍या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना चर्चेचा विषय ठरली आहे. शहादाचे तहसीलदार संभाजी पाटील यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी वाहनाचा कथितरीत्या वैयक्तिक कामासाठी वापर करण्यात आल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगत आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तहसीलदार संभाजी पाटील यांच्‍या पत्नीने घरगुती किराणा खरेदीसाठी सरकारी वाहन तसेच शासकीय चालकाचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत असून सरकारी संसाधनांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासकीय नियमांनुसार शासकीय वाहनांचा वापर केवळ अधिकृत कामांसाठीच अपेक्षित असतो. त्यामुळे संबंधित वाहनाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, तसेच तो नियमांनुसार होता का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी स्‍वत: संभाजी पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त केलेली नसून, महसूल विभागातील अन्‍य वरिष्‍ठांनीही अधिकृतरित्‍या भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, सरकारी वाहनाच्‍या अशा कथिक गैरवापराबाबत सध्‍या तरी सोशल मीडियासह विविध स्तरांवर खमंग चर्चा सुरू आहे. आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी जोरदार मागणीही होत आहे.
दरम्यान, सरकारी यंत्रणेची पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी अशा प्रकरणांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. अर्थात, संबंधित चर्चेची आणि त्‍या माध्‍यमातून केल्‍या जाणार्‍या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button