म्हसावद पोलिसांची ‘रॉयल’ कामगिरी : धडगाव तालुक्याच्या सिंधीदिगरमध्ये झोपडीत दडवलेला सव्वातीन लाखांचे विदेशी दारूचे ५५ खोके जप्त

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध धंदे करणार्यांविरोधात जोरदार मोहीम उघडताना म्हसावद पोलिसांनी सोमवारी (दि. १५) या मोहिमेचा ‘रॉयल’ शुभारंभ केला. म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधीदीगर (ता. धडगाव) येथे एका झोपडीत अवैधरित्या साठवून ठेवलेला ‘रॉयल ब्लू व्हिस्की या विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधीदीगर गावात एका घरामागील झोपडीत मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा दडवून ठेवल्याची गुप्त माहिती खबर्याकडून म्हसावदचे सहायक पोलीस निरीक्षक वावरे यांना मिळाली होती. यानंतर तातडीने म्हसावद पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारून अवैधरित्या साठवून ठेवलेली विदेशी दारू जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रॉयल ब्लू व्हिस्की या कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या प्लास्टिक बाटल्यांचे एकूण ५५ खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या असून, जप्त दारूची एकूण किंमत ३ लाख १६ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मोटु हुकार पावरा (रा. सिंधीदीगर, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे. वैध पास किंवा परवाना नसताना विदेशी दारूचा साठा करून बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचा आरोप मोटू पावरा याच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वसंत दिवल्या वसावे यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रणसिंग सनेर करीत आहेत.
…यांनी केली कारवाई
ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ धिरसिंग वळवी, दादाभाई सावळे, रणसिंग सनेर, पोलीस नाईक अजय पवार, कॉन्स्टेबल मुकेश राठोड, दीपक पाटील, राकेश पावरा, महेश पावरा, वसंत वसावे आदींच्या पथकाने केली.



