महाराष्ट्र

तोरणमाळमध्‍ये उत्‍सव शाळाप्रवेशाचा, शिक्षकांच्‍या झापाझापीचा; अनवानी विद्यार्थी, अस्‍वच्‍छता पाहून शिक्षणमंत्री दादा भुसे संतापले, शिक्षकांना खडसावले!

तोरणमाळ (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : निसर्गरम्य आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शाळा प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, हा प्रवेश सोहळा शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांच्‍या केलेल्‍या कानउघाडणीनेच जास्‍त गाजला. शाळाप्रवेशाचा सोहळा असूनही शाळेत अस्‍वच्‍छता आणि अनवाणी पायाने विद्यार्थी येत असल्‍याचे पाहून संतापलेल्‍या भुसे यांनी शिक्षकांची कानउघाडणी केली.
तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस केंद्रीय निवासी शाळेत आयोजित कार्यक्रमात सोमवारी (दि. १५) नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शिक्षण, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना भुसे यांनी राज्यातील दुर्गम वाड्या-पाड्यांपासून ते शेवटच्या बालकापर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नशील असल्‍याचे सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यालाही शासन प्राधान्य देत आहे., असे ते म्‍हणाले.
अन्‌ शिक्षणमंत्री संतापले…
यावेळी भुसे यांनी निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत माहिती दिली. मात्र याचवेळी त्‍यांनी एवढा मोठा कार्यक्रम सुरू असूनही शाळेत व परिसरात अस्‍वच्‍छता असल्‍याच्‍या मुद्द्यावरून भुसे यांनी संताप व्‍यक्‍त केला. तसेच शाळाप्रवेशाच्‍या सोहळ्‍यालाच विद्यार्थी अनवाणी पायाने शाळेत आल्‍याचे पाहूनही भुसे यांचा संताप झाला. या दोन्‍ही मुद्द्यांवरून त्‍यांनी शिक्षकांची कानउघाडणी केली. हे चित्र शिक्षकांसाठी आणि एकूणच शासकीय शिक्षण व्‍यवस्‍थेसाठी भूषणावह नसल्‍याचे भुसे म्हणाले.
यावेळी आ. आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय घंटा वाजवून नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील गुणवंत विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button