‘झिंगाट’ होऊन स्टेअरिंग हाती घेणे पडणार महागात; नंदुरबार आरटीओ ॲक्शन मोडवर; खासगी ट्रॅव्हल्स चालकांची आता होणार नियमित ड्रिंक टेस्ट!
नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मद्याचे दोन घोट घेऊन वाहनाचे स्टेअरिंग हाती घेत स्वत:सह प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे आता खासगी ट्रॅव्हल्स चालकांना महागात पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात मद्यधुंद खासगी ट्रॅव्हल्स चालकामुळे झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आला असून जिल्ह्यातील खासगी ट्रॅव्हल्स चालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पुणे, मुंबई तसेच इतर प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्ह चाचणी करण्यात येत आहे. महामार्गांवर विशेष नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून चालकांची तपासणी केली जात असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, तपासणीत मद्यप्राशन केल्याचे आढळून येणाऱ्या चालकांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा चालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, खासगी ट्रॅव्हल्स चालकांची नियमित ड्रिंक टेस्ट होत नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने ही मोहीम सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओची ही धडक मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. “मद्यधुंद चालकांना आता रस्त्यावर थारा नाही”, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



