शहादाच्या शिरपेचात मानाचा तुरा : नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या गळ्यात महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या सचिवपदाची माळ!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आपल्या वेगळ्या शैलीने शहादावासीयांच्या मनात घर करून शहादच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झालेले अभिजित पाटील यांच्यामुळे शहादा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या कार्यकारिणीत शहादाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित विमलबेन मोतीलाल पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील अंधेरी परिसरात असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्यालयात नगरपरिषदा महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या नव्याने कार्यकारिणी गठीत करण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये शहादाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या गळ्यात महासंघाच्या सचिवपदाची माळ घालण्यात आली.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद महासंघ हा राज्यातील सुमारे ३९५ नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचा प्रतिनिधी महासंघ असून, नगरपरिषदांशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच धोरणात्मक विषयांवर कार्यरत आहे. महासंघाच्या अध्यक्षा रुचिता घोरपडे, कार्याध्यक्ष रंजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष तथा महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी राज्यातील सहाही महसूल विभागांतील नगराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



