पोलिसांनी उतरवली गांजा विक्रेत्यांची ‘झिंग’ : खांडबारा, नवापुरात धडाकेबाज कारवाई, ७.५ किलो गांजासह तिघांच्या मुसक्या आवळल्या
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नशेखोर आणि अंमली पदार्थांची विक्री करणार्यांविरोधात कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली असून, याच अंतर्गत नवापूर व खांडबारा येथे धडाकेबाज कारवाई करून गांजाची विक्री करणार्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांकडून तब्बल साडेसात किलो गांजा जप्त करण्यात आला.
नवापूर शहरालगतच्या धनलक्ष्मी पार्क परिसरातील एका घरात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच नवापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संबंधित ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी झडती घेतली असता तब्बल ५.५ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. सुमारे ९० हजार रुपये किमतीचा हा गांजा ताब्यात घेत पोलिसांच्या पथकाने येथे दोघांना बेड्या ठोकल्या.
याआधी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने विसरवाडी पोलिसांच्या साथीने खांडबारा येथील शिवाजी चौक परिसरात धाड टाकून दोन किलो गांजा जप्त केला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व विसरवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी हा गांजा विकणार्या सचिन फलले याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



