नंदुरबार जिल्ह्यात ग्राहकांची खुलेआम लूट; छापील किमतीपेक्षा वाढीव दराने वस्तूंची विक्री; अ.भा. ग्राहक पंचायतीचा संताप, जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन म्हणाले, हे रोखा…

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात वस्तूंवर छापलेल्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा अधिक दर आकारून व्यापारी खुलेआम ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने संताप व्यक्त केला असून, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
चित्रपटगृहे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, व्यापारी संकुले, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकारांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कमाल किरकोळ किंमत ही ग्राहकांसाठी निश्चित करण्यात आलेली अंतिम विक्री किंमत असून, त्यापेक्षा अधिक रक्कम आकारणे नियमबाह्य आहे. तरीही अनेक ठिकाणी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याने संबंधित विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व आस्थापनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत देशभरात ग्राहक हक्कांसाठी जनजागृती, निवेदन मोहीम आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. ग्राहकांचे हित जपले जावे व त्यांची आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी अ. भा. ग्राहक पंचायतीच्या राज्य उपाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हाध्यक्ष डी. सी. पाटील, जिल्हा सचिव रणजित राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मधुकर देसले, मंगेश येवले तालुकाध्यक्ष अनिल भामरे तसेच नंदुरबार तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील उपस्थित होते.



