मार्केट पोस्ट

मोठी बातमी! : पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्‍या किमती आणखी भडकणार; केंद्र सरकारकडून स्‍पष्‍ट संकेत, आंतरराष्‍ट्रीय घडामोडींमुळे वाढलेल्‍या दबावाचे कारण

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : घरगुती वापराच्‍या सिलिंडरच्‍या (एलपीजी) दरात २९ रुपयांची वाढ होऊन दोन दिवस उलटत नाही तोच केंद्र सरकारने या गॅस सिलिंडरच्‍या किमती आणखी महागण्‍याचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे एलपीजी गॅसच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरच्‍या दरात नजीकच्‍या भविष्‍यात आणखी वाढू शकतात, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
देशांतर्गत इंधनाच्‍या वाढत्या दरांवर स्पष्टीकरण देताना प्रल्‍हाद जोशी यांनी जागतिक संकटाचा दाखला दिला. ते म्हणाले, “गॅस सिलिंडरच्या दरवाढीचे आम्‍हालाही दुःख आहे. मात्र, या दरवाढीवर टीका करणार्‍यांनी आधी जगातील सद्यस्थिती समजून घ्‍यावी. संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करीत असून, सगळीकडेच मालवाहतूक आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एलपीजी गॅस सध्‍या मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होत आहे. गॅसची मूळ किंमतही वाढली आहे. माल एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवण्यासाठी सध्‍या तब्बल ४० ते ४५ दिवस लागत आहेत, यामुळे वाहतूक आणि विम्याचा खर्च प्रचंड वाढला आहे.”
दरवाढीमुळे सामान्य जनतेची होणारी अडचण आम्‍हालाही माहिती आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण परिस्थितीमुळे इंधनाच्‍या दरात वाढ केल्‍याशिवाय आमच्‍यापुढे पर्याय नाही, असेही जोशी यांनी स्‍पष्‍ट केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button