आता बोंबला : धोंड्यातील सोन्याच्या अंगठीसाठी जावयाला पाहावी लागली मांजरीच्या मरणाची वाट!; सासूचीही झाली मोठी अडचण

बीड (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है’ हा हिंदी चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग आता बदलायची वेळ आली आहे. त्याऐवजी आता ‘एक बिल्ली जमाई का दिमाग हिला देता है’ असा नवा डायलॉग येऊ घातला आहे. याचे कारण ठरले आहे, बीड जिल्ह्यातील माजलगावात घडलेला एक प्रकार. माजलगावातील एका वस्तीवर अधिक मासानिमित्त जावयासाठी सासर्यांनी ठेवलेल्या धोंडे जेवणाच्या वेळी सोन्याची अंगठी दडवून ठेवलेला धोंडा चक्क मांजरीने गिळून घेतल्याची घटना घडली. यामुळे सासूची तर अडचण झालीच पण ही सोन्याची अंगठी मिळवण्यासाठी जावयाला चक्क मांजराच्या मरणाची वाट पाहावी लागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगावात एका ठिकाणी चार दिवसांपूर्वी ही अनोखी घटना घडली. अधिक मासानिमित्त आपल्या जावयासाठी सासरच्या मंडळींनी धोंडे जेवणाचा बेत आखला होता. यावेळी जावयाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सासूबाईंनी ५ ग्राम सोन्याची अंगठी चक्क धोंड्यात दडवून ठेवली आणि तो धोंडा इतर धोंड्यांमध्ये मिसळून ठेवला.
जेवणानंतर आहेराच्या वेळी हे धोंडे जावयाला देण्याचा सासरच्यांचा बेत होता. मात्र, याच दरम्यान जेवणानंतरची आवराआवर सुरू असतानाच तेथे आलेल्या मांजराने नेमका अंगठी दडवून ठेवलेला धोंडा फस्त केला. यामुळे सासरच्यांचे धाबे दणाणले. अखेर अंगठी असलेला धोंडा मांजरीच्या पोटातून बाहेर येण्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला. त्यासाठी मांजरीला चक्क चार दिवस घरातून बाहेरच पडू दिले गेले नाही. विष्ठेच्या माध्यमातून अंगठी बाहेर पडेल, असे सार्यांना वाटले खरे. पण प्रत्यक्षात तसे घडलेच नाही. त्यामुळे शेवटी मांजरीला पशुवैद्यकाकडे नेण्यात आले.
तेथे पशुवैद्यकाने मांजरीला उलटी होण्याचे औषध दिले. पण घडले उलटेच. मांजरीने उलटी पण केली नाही. परंतु, या सार्यांत मांजरीचा जीव गेला. या सगळ्यात अंगठीत जीव अडकलेल्या सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला होता. शेवटी मांजरीवर शस्रक्रिया करून तिच्या पोटातून अंगठी काढण्यात आली. यामुळे सार्यांचाच जीव भांड्यात पडला आणि काही वेळातच ‘ती’ अंगठी जावयाच्या हातात घालण्यात आली.


