फिचर्स

आज संकष्टी चतुर्थी, श्री गणेशाच्‍या उपासकांनो पूर्ण फळ मिळवायाचे तर उपवास सोडताना करू नका ‘ही’ चूक

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्‍यापासून सुरू झालेल्‍या नव्‍या हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आज, रविवारी (दि. ५) साजरी केली जात आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला ‘विकट संकष्टी’ असे संबोधले जाते. अनेकदा भक्त दिवसभर उपवास करतात, पण उपवास सोडताना काही छोट्या चुका करतात, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. या चुका कोणत्‍या आणि त्‍या टाळण्‍यासाठी काय करावे, याची माहिती खास ‘नंदुरबार पोस्‍ट’च्‍या वाचकांसाठी…

चंद्रदर्शनाशिवाय सोडू नका उपवास : संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शनावर अवलंबून असतो. आकाशात चंद्र दिसून त्‍याला अर्घ्य दिले जात नाही, तोपर्यंत हा उपवास अपूर्ण असतो. आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागात रात्री ९.४५ वाजता चंद्रोदयाची वेळ आहे. त्यापूर्वी घाईने जेवण करणे टाळावे.
असा द्यावा चंद्राला अर्घ्य : चंद्रोदय झाल्यावर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात अक्षता, पांढरी फुले आणि थोडे चंदन टाकावे. चंद्राकडे बघून हे पाणी जमिनीवर सोडावे. यावेळी ‘ओम्‌ गं गणपतये नम:’ किंवा चंद्राच्या मंत्राचा जप करावा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच प्रत्यक्ष उपवास सोडण्याची प्रक्रिया सुरू होते.
गणरायाला नैवेद्य दाखवणे अनिवार्य : उपवास सोडताना जेवणापूर्वी गणपती बाप्पाला शुद्ध सात्त्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. संकष्टीला श्री गणरायाला मोदक किंवा लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते. मोदक शक्य नसल्‍यास गुळ-खोबरेही चालेल. नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास सोडू नये, हे मात्र नक्‍की.
कांदा, लसूण टाळा : उपवास सोडताना आपण ग्रहण करीत असलेले अन्न पूर्णपणे सात्त्विक असावे. जेवणात कांदा व लसूण यांचा वापर टाळावा. दिवसभर उपवास करून रात्री जेवणात कांदा-लसूण घातलेले पदार्थ खाल्‍ल्‍यास व्रताची सात्त्विकता संपते. उपवास सोडताना साधे वरण-भात किंवा पालेभाजीचे सेवन करणे उत्तम.
पाण्याने उपवास सोडावा : नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वात आधी बाप्पाचे तीर्थ किंवा थोडे पाणी पिऊन उपवास सोडावा. त्यानंतरच अन्न ग्रहण करावे.
जेवायला बसताना दिशा सांभाळा : उपवास सोडताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये.
टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. ‘नंदुरबार पोस्‍ट’ याचा कोणताही ठोस दावा करीत नाही. केवळ श्री गणरायांच्‍या भक्‍तांपर्यंत योग्‍य माहिती पोहोचविणे हा ही माहिती येथे देण्‍याचा उद्देश आहे.)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button