रोखठोक : शहाद्यातील खराब रस्त्यांवर ‘हेलिकॉप्टर’चा उतारा; कहाटुळकरांना हवाई सेवेचा ‘प्रथम मान’ मिळण्याचे संकेत!

शहादा (प्रा. डी.सी. पाटील) : ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या त्रासातून स्थानिक रहिवाशांची सुटका करण्यासाठी राज्य शासनाने एक अनोखा आणि धडाकेबाज निर्णय घेणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ज्या भागातील रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली वर्षानुवर्षे रखडले आहेत, तिथल्या ग्रामस्थांना आता चक्क कमी खर्चात हेलिकॉप्टरने प्रवास उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. या अभिनव योजनेत नंदुरबार जिल्ह्यातून ‘मोहिदा तर्फे शहादा ते कहाटुळ’ या अतिशय खडतर मार्गाला पहिला मान मिळणार असून, लवकरच येथे हेलिकॉप्टर घोंगावण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, या हवाई प्रवासाचा खर्च निष्काळजी ठेकेदार, संबंधित अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या खिशातून वसूल केला जाणार असल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहादा तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानिक प्रशासन, अभियंते आणि ठेकेदार यांच्यातील नियोजनाच्या अभावामुळे कामे रखडली आहेत. साधी दुचाकी चालवतानाही पाठीची हाडे खिळखिळी व्हावीत, अशी परिस्थिती असल्याने या भागातील स्थानिक रहिवाशांना वर्षानुवर्षे मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, आता शासनाच्या या नव्या प्रस्तावामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा प्रशासनाची तत्परता; युद्धपातळीवर हालचाली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या अनुषंगाने शासनाने हेलिकॉप्टर सेवेसाठी चाचपणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. हे आदेश येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सूत्रे हलवली आहेत. पावसाळ्यापूर्वी रखडलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंत्यांनी योग्य जागेची पाहणी करून ‘हेलिपॅड’ उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे या निर्देशात म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शासन आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात यासंदर्भात ३ ते ४ महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. वेळेचे बंधन असल्याने अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता, ठेकेदारांशी थेट चर्चा करून याद्या बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक खराब रस्ता म्हणून मोहिदा ते कहाटुळ मार्गाची नोंद झाली आहे. त्यामुळे तहसील कार्यालय परिसर, मोहिदा, सोनवद, कवठळ आणि कहाटुळ गावातील रिकाम्या (बखळ) जागा शोधण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.
‘तहसील विरुद्ध सार्वजनिक बांधकाम’ : अंतर्गत कलगीतुरा!
रस्ते दुरुस्ती रखडवण्याची मुख्य जबाबदारी बांधकाम विभागाची असताना, या हवाई व्यवस्थेची आणि देखरेखीची जबाबदारी मात्र तहसील प्रशासनावर टाकण्यात आली आहे. यामुळे तहसील प्रशासन सध्या बांधकाम विभागावर चांगलेच ‘दातओठ खाऊन’ राग व्यक्त करत आहे.
‘हौशा-गवशांचा’ राबता वाढणार; ग्रामस्थांना चिंता आदरातिथ्याची!
येत्या दीड महिन्यात ही कहाटुळ हवाई सेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. एकीकडे ग्रामस्थ आनंदात असले, तरी त्यांच्या मनात एक वेगळाच ताण निर्माण झाला आहे. हेलिकॉप्टर पाहण्यासह हवेत सफर मारण्यासाठी इतर गावांतील ‘हौशे-नवशे-गवशे’ मोठ्या संख्येने गावात गर्दी करतील. त्यांच्या चहा-पाण्याचा आणि आदरातिथ्याचा अतिरिक्त खर्च कसा झेलायचा, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
रेशन दुकानातून ‘आदरातिथ्य निधी’ द्या!
हवाई सेवा सुरू असेपर्यंत शासनाने रेशन दुकानामार्फत ग्रामस्थांना विशेष ‘आदरातिथ्य निधी’ किंवा भत्ता द्यावा, अशी गमतीदार पण हक्काची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
नियमित कामांना ‘ब्रेक’
या गतिमान आणि नाविन्यपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागात सध्या अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ वाढली आहे. हे हेलिकॉप्टर कधी उडणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे तहसील प्रशासनाने नेहमीप्रमाणे आपल्या नियमित शासकीय कामांना तात्पुरता ‘ब्रेक’ लावून संपूर्ण लक्ष हेलिकॉप्टर सेवेच्या नियोजनावर केंद्रित केले आहे. स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने व प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
टीप : (हे उपरोधिक लिखाण करणारे लेखक हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष आहेत.)


