‘दिल ग़म से जल रहा है’ : नंदुरबारच्या संकल्प ग्रूपकडून स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना स्वर सुमनांजली!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आपल्या मधूर आणि सुश्राव्य आवाजाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणार्या आणि भावगीतांची सम्राज्ञी राहिलेल्या प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना नंदुरबारच्या संकल्प ग्रुपच्या वतीने भावपूर्ण स्वरसुमनांजली वाहण्यात आली.
नंदुरबारच्या डी.आर. हायस्कूलमध्ये शहरातील नामांकित कलावंत, गुरुजन, गायक कलाकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध गायक-कलावंतांनी कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करून त्यांना सुरेल मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलचे चेअरमन नरेंद्र सराफ होते. तर पुण्याचे संगीत तज्ज्ञ गोविंदराव कुलकर्णी, सविता कुलकर्णी, संकल्प ग्रुपचे अध्यक्ष कैलास मराठे, प्रा. डॉ. माधव कदम, रणजीत राजपूत, नितीन पाटील, अभिषेक राजपूत, दीपक चौधरी, श्रीराम दाऊतखाने, गायक कलावंत विजय अजमेरा, विष्णू पाटील,चंपालाल चौधरी, मनोज वसईकर, बाल साहित्य परिषद चे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, जितेंद्र खवळे, प्रा.अरुण कायस्थ, वास्तु विशारद राजेंद्र कासार आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी सुमन कल्याणपूर यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव करीत त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. गायक महिला कलावंत प्रतिभा कुलकर्णी, रचना निकम, अनिता सोमवंशी, मनीषा माळी, विशाखा विष्णू पाटील आदींनी सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कदम यांनी केले. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी अधोरेखित करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संकल्प ग्रुपचे डॉ. शिरीष शिंदे, डॉ. रोशन भंडारी, डॉ राजेश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.



