नंदुरबार शहर

नंदुरबार हादरले : सुरक्षा रक्षकाच्‍या बंदुकीतून अचानक सुटली गोळी; खाली आदळली अन्‌ फरशी फुटून एकाला लागली; भरवस्‍तीतील थरारक घटना, कारण गुलदस्‍त्‍यात

नंदुरबार (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातून धक्‍कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या मुख्‍य शाखेजवळ एटीएमला रोख रकमेचा पुरवठा करणार्‍या कॅश व्‍हॅनच्‍या सुरक्षा रक्षकाच्‍या बंदुकीतून गोळी सुटल्‍याची घटना घडली. या बंदुकीचे तोंड खालच्‍या दिशेने असल्‍याने ही सुटलेली गोळी फरशीवर आदळून ती फरशी फुटली आणि त्‍या फरशीचे तुकडे लागून बँकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. सध्‍या या जखमी कर्मचार्‍यावर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, भरवस्‍तीत हा प्रकार घडल्‍याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
या धक्‍कादायक घटनेची माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी भारतीय स्‍टेट बँकेच्‍या मुख्‍य शाखेत रोकडचा पुरवठा करण्‍यासाठी बँकेची कॅश व्‍हॅन आली होती. या व्‍हॅनमधून रोकड काढण्‍याची प्रक्रिया सुरू असतानाच या व्‍हॅनच्‍या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकाच्‍या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. यामुळे मोठा आवाज झाला. अचानक घडलेल्‍या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. दरम्‍यान, बंदुकीतून सुटलेली गोळी खाली फरशीवर आदळून मोठा आवाज झाला. सदरील फरशी गोळीच्‍या धक्‍क्‍याने फुटली आणि तिचे तुकडे होऊन हे तुकडे आजूबाजूला उडाले आणि यातील काही तुकडे त्‍या ठिकाणी उभ्‍या असलेल्‍या संजय दगाजी गायकवाड (४३, रा. उमर्दे खुर्द, ता. नंदुरबार) यांच्‍या शरीरात घुसले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्‍यांना तातडीने खासगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. तेथे सध्‍या त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत.
मिस फायरची चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत पाहणी केली. सध्‍या सदरील सुरक्षा रक्षकाच्‍या बंदुकीतून चुकीने गोळी सुटलीच कशी, याची चौकशी सुरू आहे. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आठवडाभरात दुसरी घटना
गेल्‍याच आठवड्यात नंदुरबार शहरानजीकच्‍या बिलाडी शिवारात परस्‍पर वादातून एकावर बंदुकीतून गोळी झाडण्‍यात आली होती. त्‍यानंतर आता थेट शहरात भरवस्‍तीतच बंदुकीतून गोळी सुटल्‍याचा प्रकार घडल्‍याने खळबळ उडाली आहे. शिवाय या घटनेमुळे नंदुरबारवासीयांमध्‍ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button