नंदुरबार जिल्हा

दुर्गम आदिवासी भागांपर्यंत ड्रोनद्वारे पोहोचणार आरोग्य सेवा; नंदुरबारच्‍या आरोग्य व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम, डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांमध्ये राहणाऱ्या हजारो आदिवासी नागरिकांना वेळेवर व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पा’चा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
जिल्हा प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्याने हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत असून, दुर्गम भागांपर्यंत औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक नमुने अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रारंभी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावऱ्या दिगर या सुमारे १८ कि.मी. अंतराच्या मार्गावर सुरू करण्यात आला आहे. या ड्रोन सेवेचा लाभ धडगाव तालुक्यातील झापी, बिलगाव, रोषमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा आणि जंगठी या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ३३ गावांतील २१ हजारांहून अधिक रहिवाशांना होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुके हे राज्यातील सर्वाधिक दुर्गम व आदिवासीबहुल भागांपैकी एक मानले जातात. विशेषतः नर्मदा नदीकाठावरील अनेक गावे पावसाळ्याच्या काळात मुख्य प्रवाहापासून तुटून संपर्कविहीन होतात. अनेक वेळा रस्ते वाहून जातात, पूरस्थिती निर्माण होते किंवा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास औषधे व आरोग्य सेवा वेळेत पोहोचविणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत ड्रोनच्या माध्यमातून आवश्यक औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य काही मिनिटांत पोहोचविणे शक्य होणार असल्याने दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे.
शिवाय प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक रक्त, लघवी किंवा इतर नमुने तातडीने आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचविता येणार असल्याने गंभीर रुग्णांचे निदान आणि उपचार प्रक्रिया अधिक वेगाने होण्यास मदत मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थिती, साथीचे रोग, माता-बाल आरोग्य सेवा तसेच लसीकरण मोहिमांसाठीही या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम भागातील रहिवाशांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न असून, यामुळे आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास या प्रसंगी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला शहादाचे आ. राजेश पाडवी, अक्कलकुवा-धडगावचे आ. आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागाचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button