चोर तो चोर अन् वरून शिरजोर : शहाद्यात वाळूची अवैध वाहतूक करताना वाहन पकडताच महसूल पथकाला दमदाटी; वाहन चालकासह मालकावरही गुन्हा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वाळूची चोरी करून तिची अवैध वाहतूक करताना पकडले गेल्यावर चूक मान्य करण्याऐवजी थेट महसूल पथकालाच दमदाटी आणि शिविगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहादा येथे घडला. या प्रकरणी अखेर मंडळ अधिकार्याच्या तक्रारीवरून संबंधित वाहन चालकासह वाहनाच्या मालकाच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा ते खेतिया बायपास रस्त्यावरील नवीन बसस्थानकाजवळ रात्री उशीरा ९ वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे पथक गौणखणिजाची (वाळ, मुरूम आदी) अवैध वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत होते. याच दरम्यान एका वाहनातून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय या पथकाला आला.
पथकाने तातडीने हे वाहन अडवून चालकाकडे चौकशी सुरू केली. याचवेळी वाहन मालक सुनील माळी (३७, रा. होळ मोहिदे, ता. शहादा) याच्यासह अन्य दोन अज्ञात व्यक्तींनी महसूल विभागाच्या पथकालाच दमदाटी व शिविगाळ सुरू केली. एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली, असे मंडळ अधिकारी मुकेश भानुदास चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक साहेबराव जाधव करीत आहेत.



