महाराष्ट्र

नंदुरबारची माणसं हुश्‍शार, लावताहेत पर्यावरण संवर्धनाला हातभार; २७ हजार ग्राहकांनी कागदाचा कमी वापर करून केली ३२.९४ लाखांची बचत!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आदिवासींचा जिल्‍हा अशी ओळख असलेल्‍या नंदुरबारच्‍या जिल्‍हावासीयांनी पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्‍यात मोठी आघाडी घेतली आहे. कागदाचा कमीत कमी वापर करून वृक्षतोड आणि पर्यायाने पयार्वरणाचा र्‍हास टाळण्‍यासाठी महावितरण कंपनीने आणलेल्‍या ‘गो ग्रीन’ योजनेत हजारो नंदुरबारकरांनी सहभागी होत तब्‍बल ३२ लाख ९४ हजार रुपयांची बचत करून अनोखा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
पर्यावरण संरक्षणासह ग्राहकांना बचतीचा लाभ देण्‍याच्‍या उद्देशाने महावितरण कंपनीने ‘गो ग्रीन’ योजना आणली आहे. याअंतर्गत महावितरणच्‍या वीज संगणक प्रणालीत विज बिल तयार होताच ते ग्राहकांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे पाठविले जाते. या योजनेत ग्राहकांचे वीज बिल प्रत्यक्ष प्रिंट केले जात नसल्याने कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. ग्राहकांना फायदा होण्यासोबतच या योजनेमुळे ग्राहकाला बिल घरपोच देण्याचा महावितरणचा खर्च देखील वाचला आहे. या योजनेत डिजिटल बिलाचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरण तर्फे प्रत्येक महिन्याला दहा रुपये म्हणजेच वार्षिक १२० रुपयांची सवलत वीजबिलात दिली जाते.
कागदी वीज बिलाला पर्याय म्हणून महावितरण आणलेल्या या योजनेचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ४५१ ग्राहकांनी ई-मेल आणि एसएमएसद्वारे वीज बिल स्वीकारले आहे. यातून नंदुरबार जिल्ह्यातील या ग्राहकांनी गेल्या काही काळात तब्बल ३२ लाख ९४ हजार रुपयांची बचत केली आहे. खानदेशातील तीन जिल्ह्यात मिळून अशी बचत करणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल पावणेदोन लाखांवर पोहोचली आहे. या सर्वांनी मिळून आतापर्यंत दोन कोटी २७ लाख ७० हजार १२० रुपयांची बचत केली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button