नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कारवाई : आंतरराज्यीय घरफोड्यांच्या टोळीला बेड्या; तिघांच्या मुसक्या आवळल्या, १७.३४ लाखांचा ऐवज जप्त

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सारंगखेडा परिसरात सातत्याने सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) घरफोड्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत एलसीबीने तिघांना बेड्या ठोकतानाच त्यांच्याकडून १७ लाख ३४ हजार ४९ रुपयांचा ऐवज ज नंदुरबार येथे केला. यात घरफोडीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराळे गावात २९ मे रोजी रात्री युवराज शंकर माळी व किशोर भरत पाटील यांच्या घरांचे मागील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख १५ हजार २०० रुपयांच्या दागिन्यांसह रोकड पळविली होती. या पाठोपाठ नांदरखेडा, फेस व तोरखेडा येथेही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.
सारंगखेडा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने या घटनांचा समांतर तपास सुरू केला होता. याच दरम्यान १ जून रोजी जयनगर गावाजवळ विनानंबर दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मिठाराम भावसिंग तडवी (३४, रा. मुहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) हा पोलिसांच्या तावडीत सापडला. चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने रतला मालसिंग तडवी व जगदिश प्रताप तडवी यांच्या साथीने सारंगखेडा परिसरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच ५ लाख ८३ हजार ५० रुपयांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची मोटारसायकल असा एकूण ६ लाख ८३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला.
यानंतर त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार उर्वरित दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींकडून एकूण ९९.६१ ग्रॅम वजनाचे १४ लाख ९४ हजार १५० रुपयांचे सोन्याचे दागिने, १ लाख ३९ हजार ८९९ रुपयांचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपयांची मोटारसायकल असा एकूण १७ लाख ३४ हजार ४९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सारंगखेडा पोलीस ठाणे तसेच मालमत्तेविरुद्ध तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.



