नंदुरबार जिल्हा

नंदुरबारच्‍या जिल्‍हाधिकारी कडाडताच शहाद्यातील डांबरखेडा पुलाच्या कामाला वेग; मेअखेर अवजड वाहनांसाठी मार्ग होणार मोकळा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील डांबरखेडा गावाजवळील अत्यंत महत्त्वाच्या पुलाच्या कामाला अखेर गती मिळाली असून, जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी थेट हस्तक्षेप करीत काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता प्रशासनाच्या सक्रिय भूमिकेमुळे मे महिन्याच्या अखेरीस हा पूल पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डांबरखेडा पूल हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या ब्रहाणपूर–अंकलेश्वर या महत्त्वाच्या महामार्गावर स्थित आहे. त्यामुळे या पुलाचे धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्वही मोठे आहे. मात्र, पुलाची अवस्था गेल्या काही काळापासून अत्यंत धोकादायक झाली होती. यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. सध्या केवळ हलक्या वाहनांची मर्यादित वाहतूक सुरू असली तरी अपघाताचा धोका कायम असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. कामातील दिरंगाई सहन केली जाणार नाही, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशा कडक शब्‍दांत सुनावतानाच काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय पातळीवर मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सेठी यांनी माध्यमांना सांगितले की, “डांबरखेडा पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रशासन पूर्णतः कटिबद्ध आहे. मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.” त्यांनी संबंधित यंत्रणांना नियमित पाहणी करून कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हा पूल पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांसाठीही मार्ग खुला होणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. सध्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाने मोठा फेरा मारावा लागत असल्याने वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यास या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
सुरत-नागपूर महामार्गाचे कामही संथ गतीने
दरम्यान, सुरत–नागपूर महामार्गाचे कामही काही ठिकाणी संथ गतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या कामालाही वेग देण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक रहिवाशांन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मते, हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर परिसराच्या आर्थिक विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूणच, प्रशासनाच्या ठोस भूमिकेमुळे डांबरखेडा पुलाच्या कामाला नवसंजीवनी मिळाली असून, येत्या काही महिन्यांत हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button