वाह रे चोरटे : चक्क कारमधून पळवल्या शेळ्या; आधी वृद्धेला शस्राचा धाकही दाखवला; शहादा तालुक्यातील घटना
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातही चोरटे हायटेक झाले असून, शहादा तालुक्यात अशीच एक चोरीची वेगळी घटना समोर आली आहे. आजवर शेळ्या चोरण्यासाठी मालवाहू वाहनांचा वापर केला जात असताना शहाद्याच्या ब्राह्मणपुरी गावात मात्र चोरट्यांनी चक्क शेळ्या चोरण्यासाठी चक्क कारचा वापर केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या चोरटे एका कारने ब्राह्मणपुरी शिवारात दाखल झाले. येथे त्यांनी पारुबाई काळू ठाकरे या वृद्धेला धारदार शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन शेळ्या आपल्या कारमध्ये कोंबल्या. चोरटे तिथून निसटताच पारुबाई यांनी आरडाओरड करीत आसपासच्या लोकांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती शहादा पोलिसांना कळवली. मात्र, हे शेजारी तेथे दाखल होईपर्यंत चोरटे कारसह पसार झाले होते.
विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. आता सीसीटिव्ही फुटेज हाती आल्याने ही कार आणि चोरटे यांचा शोध घेण्याचे आव्हान शहादा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.



