नंदुरबारकरांच्या नशिबी ‘वेटिंग’च : दादर – भुसावळ एक्स्प्रेस नियमित झाल्याची मंत्र्यांची घोषणा; प्रत्यक्षात ‘रेल्वे’कडून परिपत्रकच नाही; जुलैनंतरच अंमलबजावणी शक्य

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारसह खानदेशातील प्रवाशांसाठी ‘बॅड न्यूज’ आहे. दादर – भुसावळ एक्स्प्रेस गाडीला कायमस्वरूपी नियमित दर्जा देण्यात आल्याची माहिती धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली असली तरी रेल्वे खात्याने अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. एकंदरीत ही गाडी नियमित होण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी ही बाब प्रत्यक्षात येण्यासाठी नंदुरबारसह खानेदशातील रेल्वे प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
खानदेशातून राजस्थानातील प्रसिद्ध देवस्थान खाटूश्याम व अजमेर दर्गा जाण्यासाठी काकीनाडा-हिस्सार रेल्वे नियमित झाल्याचा निर्णय झाल्यानंतर दुसर्याच दिवशी दादर – भुसावळ एक्स्प्रेस गाडीला कायमस्वरूपी नियमित दर्जा दिल्याची माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केली होती. या निर्णयामुळे मुंबईशी कनेक्टिव्हिटी आणखी घट्ट होणार असल्याने नंदुरबारसह खानदेशातील रेल्वे प्रवाशांच्या चेहर्यावर आनंदाची लकेर उमटली होती. दादर – भुसावळ ही गाडी काही बदलांसह कायमस्वरूपी नियमित झाली असून, ती नव्या क्रमांकांसह सोमवार, बुधवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नव्हे तर विशेष दर्जा हटविण्यात आल्याने या गाडीच्या प्रवासी भाडे दरात २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होणार असल्याचेही सांगितले गेले होते.
अजून निर्णय नाही
मंत्री रावल यांनी घोषणा केली असली तरी दादर – भुसावळ एक्स्प्रेस गाडीला कायमस्वरूपी नियमित करण्याबाबत रेल्वे खात्याने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे बोर्डाकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर याबाबत मध्य व पश्चिम रेल्वे विभाग संयुक्तरित्या अधिकृत परिपत्रक काढतील. त्यानंतरच ही गाडी नियमित धावू शकेल. त्यामुळे सध्या तरी आधीपासून विशेष दर्जानुसार सुरू असलेली ही गाडी तशीच ३१ जुलैपर्यत सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी बी.बी. तपस्वी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जुलै अखेरपर्यंत तरी ही गाडी नियमित होण्याबाबत वाट पाहणेच नंदुरबारसह खानदेशकरांच्या नशिबी राहणार आहे.



