सावधान : नंदुरबारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली किडनी निकामी करणारी पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने; धुळ्यात मोठा साठा जप्त झाल्याने खळबळ
धुळे / छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आयातीला बंदी असूनही भारतात आणल्या जाणार्या पाकिस्तानी फेअरनेस क्रीममुळे एका तरुणाची किडनी निकामी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आल्यानंतर आता धुळ्यातही अशा सौंदर्य प्रसाधनांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. नंदुरबारला लागून असलेल्या जिल्ह्यातच ही कारवाई झाल्याने नंदुरबारच्या बाजारपेठेतही अशी घातक सौंदर्य प्रसाधने विकली तर जात नाहीत ना, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.
याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानात उत्पादित फेअरनेस क्रीम (चेहरा गोरा करण्यासाठी वापरले जाणारे सौंदर्य प्रसाधन) वापरल्याने एका तरुणाची किडनी खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर पोलिसांनी शहरातील सिटी चौक भागातील तीन दुकानांतून सुमारे ६० हजार रुपयांची ‘मेड इन पाकिस्तान’ सौंदर्य प्रसाधने जप्त केली होती. त्यापाठोपाठ आता नंदुरबारला लागून असलेल्या धुळे शहरातही अशीच कारवाई पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. धुळ्यात सौंदर्य प्रसाधने विकणार्या दोन दुकानांतून ६१ हजार ४६३ रुपयांची अशी सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी दोन व्यापार्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
२ मे २०२५ पासून पाकिस्तानातून येणार्या सर्व वस्तूंच्या आयातील केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असताना राज्यात छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ धुळ्याच्या बाजारातही ‘मेड इन पाकिस्तान’ सौंदर्य प्रसाधने सापडणे हा नंदुरबारसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. बंदी असताना ही सौंदर्य प्रसाधने मुंबईमार्गे राज्याच्या अनेक शहरांत आणली जात असल्याचा संशय आहे.
आरोग्याला मोठा धोका
छत्रपती संभाजीनगर व धुळ्यात जप्त करण्यात आलेली सौंदर्य प्रसाधने आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या क्रीम व साबणांमध्ये ‘इथिलिन ग्लायकोल’सह ‘कार्सिनोजेनिक’ घटक आहेत. हे घटक त्वचेवाटे माणसाच्या शरीरात प्रवेश करून थेट मूत्रपिंड (किडनी) कायमचा निकामी होण्याचा धोका असतो. याशिवायही मानवी शरीरातील अन्य अवयवांवर देखील हे घटक विपरित परिणाम करण्याची शक्यता असते.
सीमावर्ती भागांतून आयात?
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, नवापूर व शहादा हे तीन तालुके महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारी आहेत. शिवाय शहादा तालुक्याची हद्द मध्यप्रदेशला देखील लागून आहे. दोन राज्यांना जोडणारी गावे व तालुके तस्करीसाठी ‘सोपी’ पडत असल्याने या ठिकाणी तस्करांचे अड्डे असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. विशेषत: या तिन्ही तालुक्यांत सीमावर्ती भागात अनेकदा शस्रे व मद्य तस्करीचे गुन्हे नोंद झाले आहेत. याच पद्धतीने तस्करी मार्गाने नंदुरबार जिल्ह्यातही पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आली नाहीत ना, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.



