नंदुरबार जिल्हा

तिसरीतील विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला सेफ्‍टी टँकमध्‍ये : नवापूरच्‍या बंधारेतील शासकीय आश्रमशाळेतील धक्‍कादायक घटना; वडिलांकडून घातपाताचा संशय व्‍यक्‍त

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्‍या नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत धक्कादायक घटना घडली आहे. या आश्रमशाळेत तिसरीत शिकणार्‍या ब्रायन राहुल गावित (८, रा. सोनखडका) या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या वसतीगृहामागील शौचालयाजवळील उघड्या सेफ्टी टँकमध्ये आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, मुलाच्या वडिलांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रायन गावित हा मुलगा शुक्रवारी (दि. ३) दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाला होता. बराच वेळ शोध घेऊनही तो न सापडल्‍याने अखेर शाळा प्रशासनाने त्‍याच्‍या कुटुंबियांना याबाबत कळवतानाच नवापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. यानंतर पोलिस, शिक्षक आणि नातेवाईकांनी परिसरात शोधमोहीम राबविली. तसेच ब्रायनचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
शोधमोहीम सुरू असतानाच शनिवारी सकाळी ९.३० ते १० वाजेच्‍या सुमारास ब्रायनचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या उघड्या सेफ्टी टँकमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नवापूरचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्‍यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, नवापूर उपजिल्‍हा रुग्‍णालयात शवविच्छेदन करण्‍यात आले.
अपघात की घातपात ?
ब्रायनच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, मुलाच्या वडिलांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरण गंभीर झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शाळा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा परिसरात उघडी व धोकादायक ठिकाणे असताना त्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्‍यान, या प्रकरणाचा सखोल तपास नवापूर पोलिसांकडून सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button