महाराष्ट्र

रस्‍त्‍याच्‍या मध्‍ये, रहदारीच्‍या ठिकाणच्‍या उघड्या विहिरींचे ऑडिट करणार; नाशिक अपघातानंतर मुख्‍यमंत्र्यांची घोषणा; मृतांच्‍या वारसांना ५ लाखांची मदत

मुंबई / नाशिक (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नाशिकच्‍या दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री अनियंत्रित झालेली कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा बळी गेल्‍यानंतर राज्‍य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्‍यभरात रस्‍त्‍याच्‍या मध्‍यभागी किंवा रहदारीच्‍या ठिकाणी असलेल्‍या अशा उघड्या विहिरींचे ऑडिट केले जाणार असल्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्‍यान, कार कोसळलेल्‍या विहिरीच्‍या मालकाविरोधात सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
दिंडोरीतील शिवाजीनगर भागात स्‍नेहसंमेलन आटोपून घरी परतणार्‍या इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबावर शुक्रवारी रात्री उशीरा काळाने घाला घातला. शिवाजीनगर परिसरातील शेतातील विहिरीत त्‍यांची कार (एमएच १५ जेएस १०५३) अनियंत्रित होऊन कोसळली. या दुर्दैवी अपघातात कारमधील सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
यापार्श्वभूमीवर राज्‍याचे आपत्ती व्‍यवस्‍थापन मंत्री गिरीश महाजन व मंत्री नरहरी झिरवळ यांनी तातडीने अपघातस्‍थळाला भेट देत घटनास्‍थळाची पाहणी केली. तसेच पोलिस आणि प्रशासनाला काही सूचना देखील केल्‍या. या पाठोपाठ मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्‍स पोस्‍ट करीत या दुर्घटनेबद्दल शोक आणि अपघातग्रस्‍तांच्‍या कुटुंबियांप्रती संवेदना व्‍यक्‍त केल्‍या.
मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना आहे. लहान मुले आणि काही मुलांचे आई-वडिल अपघातग्रस्‍त वाहनात होते. इतक्‍या लहान मुलांचे असे निधन होणे यापेक्षा आक्रोश आणि दु:ख दुसरे कुठलेच असू शकत नाही. या विहिरीला अतिशय छोटा कठडा होता आणि ती मध्‍यभागी असल्‍याने ही घटना घडल्‍याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. मृतांच्‍या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली जात आहे.
रस्‍त्‍याच्‍या मध्‍ये असलेल्‍या अशा विहिरींचे तत्‍काळ ऑडिट करून त्‍याची तिथे आवश्‍यकता आहे का, तसेच तेथे काय उपाययोजना करता येतील, या संदर्भातील सूचना संबंधितांना देण्‍यात आल्‍या आहेत. या घटनेच्‍या चौकशीचे आदेश जिल्‍हा प्रशासनाला देण्‍यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी आपल्‍या एक्‍स पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button