गुन्हे वार्ता

प्रकाशात गुटखा तस्‍करीचा पर्दाफाश; १७.६१ लाखांचा मुद्देमाल जप्‍त; शहादा पोलिसांच्‍या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अहमदाबाद- नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्‍या गुटखा तस्‍करीचा पर्दाफाश करण्‍यात शहादा पोलिसांच्‍या गुन्‍हे शोध (डीबी) पथकाला मोठे यश आले आहे. शहादा पोलिसांच्‍या पथकाने ही मोठी व धडाकेबाज कारवाई करताना सुगंधी तंबाखू मिश्रीत गुटख्‍यासह आयशर वाहन असा तब्‍बल १७ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला असून, वाहनाच्‍या चालकाला चौकशीसाठी ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.
अहमदाबादहून नंदुरबारकडे अवैधरित्या सुगंधित तंबाखू मिश्रीत गुटख्‍याची वाहतूक केली जात असल्याची गुप्‍त माहिती शहादा पोलिसांच्‍या डीबी शाखेला खबर्‍याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत प्रकाशाजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.
याच दरम्यान एक आयशर वाहन (क्र. एमएच १८ बीजी ९५०९) येताना पोलिसांना दिसली. काही बाबी संशयास्‍पद वाटल्‍याने हे वाहन रोखून पोलिसांनी गाडीची सखोल तपासणी सुरू केली. यावेळी गाडीत सुगंधित तंबाखूचे तब्बल १० बॉक्स आढळून आले. या तंबाखूची वाहतूक कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय सुरू असल्‍याचे यावेळी निष्पन्न झाले.
पोलिसांनी तत्काळ सदर सुगंधित तंबाखूच्‍या बॉक्‍ससह आयशर गाडी जप्त केली. जप्त केलेल्‍या आयशर गाडीची किंमत अंदाजे १५ लाख तर सुगंधित तंबाखू मालाची किंमत सुमारे २ लाख ६१ हजार रुपये आहे. हा सर्व १७ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला.
दरम्‍यान, या प्रकरणी संबंधित वाहनाचा चालक व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला चौकशीसाठी ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. या तंबाखूची नेमकी कुठून आणि कोणासाठी वाहतूक केली जात होती, याचा तपास शहादा पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button