मुख्य बातम्या

धक्‍कादायक अन्‌ संतापजनक : शहाद्याच्‍या तरुणाने रुग्‍णवाहिकेअभावी तडफडून सोडला प्राण; नंदुरबारच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर प्रकार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाच्‍या धडकेत गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचा चिंताजनक अवस्‍थेत धुळ्‍याला हलविण्‍यासाठी वेळेवर रुग्‍णवाहिकाच उपलब्‍ध न झाल्‍याने तडफडून मृत्‍यू झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार नंदुरबारच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडला आहे. पिंट्या जंगा शेमळे (रा. नवे गोदापूर, ता. शहादा) असे या तरुणाचे नाव असून, त्‍याच्‍या नातेवाईकांसह ग्रामस्‍थांनी या प्रकाराबाबत संताप व्‍यक्‍त करतानाच प्रकरणाच्‍या चौकशीची मागणी केली आहे.
सूत्रांन दिलेल्‍या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी पिंट्या शेमळे हा ब्राह्मणपुरी येथून खेतियाकडे जात असताना मागून आलेल्‍या अज्ञात वाहनाने त्‍याच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात डोके व हातापायांना जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. प्राथमिक उपचारानंतर त्‍याला नंदुरबारच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी हलविण्‍यात आले होते. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्‍याने डॉक्‍टरांनी त्‍याला धुळे येथील जिल्‍हा रुग्‍णालयात हलविण्‍याच्‍या सूचना सहकारी कर्मचार्‍यांना दिल्‍या होत्‍या. मात्र, रुग्‍णालयातील कर्मचार्‍यांनी त्‍याला वेळेवर रुग्‍णवाहिकाच उपलब्‍ध करून दिली नाही. यामुळे त्‍याच्‍या उपचारात उशीर झाला आणि वेदनेने तडफडून त्‍याचे प्राणोत्‍क्रमण झाले.
यानंतर पिंट्या शेमळे याच्‍या मृत्‍यूला रुग्‍णालयाचे प्रशासन जबाबदार असल्‍याचा आरोप करीत संताप व्‍यक्‍त केला. नंदुरबारहून धुळ्‍याला हलविण्‍यासाठी वेळेवर रुग्‍णवाहिका उपलब्‍ध न झाल्‍यानेच पिंट्या शेमळे याचा मृत्‍यू झाला. यामुळे त्‍याचे घर उघड्यावर पडले असून, या गंभीर प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नवे गोदापूर (ता. शहादा)चे माजी सरपंच कांतीलाल पावरा यांनी केली आहे. तर नंदुरबारच्‍या वैद्यकीय महाविद्यालयात एकच रुग्‍णवाहिका असून, रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी मागणी केल्‍यावर ही रुग्‍णवाहिका उपलब्‍ध होती का, याची चौकशी केली जाईल, असे सांगत डॉ. मिलिंद पाटील यांनी आपत्‍कालीन परिस्‍थितीत रुग्‍णांना परजिल्‍ह्यात घेऊन जाण्‍याच्‍या सूचना देऊनही १०८ रुग्‍णवाहिकेच्‍या चालकांकडून टाळाटाळ केली जात असल्‍याचे मान्‍य केले.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबारच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्‍या तीन रुग्‍णवाहिका आहेत. यापैकी एक शववाहिनी असून, दुसरी रक्‍त संकलन केंद्र म्‍हणून वापरली जाते. यामुळे रुग्‍णांना इतरत्र हलविण्‍यासाठी एकमेव रुग्‍णवाहिका उरली असून, या पार्श्वभूमीवर या रुग्‍णालयासाठी आणखी रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी वाढत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button