मार्केट पोस्ट

महागाईचा फेरा : बॉयलर कोंबडीचे दर भिडले गगनाला; किलोभरासाठी मोजावे लागताहेत २८० रुपये; फिडिंग, वाहतूक खर्च वाढल्‍याचा परिणाम

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : कोंबडीच्‍या खाद्यासह वाहतूक खर्चात झालेल्‍या वाढीमुळे विक्रेत्‍यांनी बॉयलर कोंबडीच्‍या दरात मोठी वाढ केली असून, सध्‍या हे दर किलोला तब्‍बल २८० रुपयांवर पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे कोंबडी प्रेमींसह सामान्‍य नागरिकांच्‍या खिशाला झळ बसू लागली आहे.
शहादा आणि परिसरातील बाजारात विविध कंपन्यांच्या कोंबड्यांची विक्री होते. यात सगुना, आनंद ॲग्रो, ए.व्ही. ॲग्रो, वेंकी, गोदरेज यांसारख्या अनेक ब्रँडच्या कोंबड्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या सर्वच ब्रँडच्‍या कोंबड्यांच्‍या दरात मोठी वाढ झाल्‍याचे दिसत आहे. कोंबडी खाद्य (फीड) दरवाढ, वाहतूक खर्च, तसेच उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट यामुळे कोंबडीचे दर वाढवावे लागले असल्‍याचे व्‍यापार्‍यांनी म्‍हटले आहे. परिणामी किरकोळ बाजारातही ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
दरम्यान, कोंबडी हा अनेक कुटुंबांचा स्वस्त प्रथिनांचा स्रोत मानला जातो. मात्र वाढत्या दरामुळे हा पर्यायही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. “पूर्वी आठवड्यातून एकदा तरी कोंबडी घेत होतो, पण आता दर पाहता खरेदी करणे कठीण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त असल्‍याची माहिती कोंबडी व्‍यापारी हाजी शब्बीर हाजी नबी यांनी दिली.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कोंबडीच्या दरवाढीने कोंबडीप्रेमींसह सामान्यांचे बजेट कोलमडले असून, प्रशासनाने कोंबडीच्‍या दर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button