नंदुरबार जिल्हा

धडगाव तालुक्‍याला अवकाळीचा तडाखा; वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान, शेतकर्‍यांच्‍या आशेवर पाणी

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : खान्‍देशाला सलग दुसर्‍या दिवशी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषत: नंदुरबार जिल्‍ह्यातील धडगाव तालुक्‍यात सातपुडा परिसरात अवकाळी बरसलेल्‍या या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेल्‍या पिकांना पावसाने फटका दिल्‍याने शेतकर्‍यांच्‍या डोळ्‍यात पाणी तरळले आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजेच्‍या सुमारास धडगाव अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. काही वेळातच अवकाशातून गाराही बरसू लागल्‍या. विशेषत: धडगाव तालुक्‍यातील हमाना परिसरात पावसाच्‍या जोरदार सरी बरसल्‍या. यावेळी गारांची बरसात झाल्‍याने जमिनीवर अक्षरश: पांढरी चादर पसरल्‍याचा भास निर्माण झाला होता. या पावसामुळे कडाक्‍याच्‍या उन्‍हात वातावरणात अचानक बदल होऊन तापमानात मोठी घट झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी-आंबा पिकांना बसल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत असून, शेतकर्‍यांच्‍या आशेवर पाणी फेरले जावून त्‍यांच्‍या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
खान्‍देशात सर्वत्रच अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, धुळे जिल्‍ह्यातील साक्री तालुक्‍यात गारपीट झाली. तर जळगावच्‍या गिरणा पट्ट्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्‍यांतही जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे खान्‍देशातील ज्‍वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा तसेच लिंबू व केळी बागा उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍या. बेमोसमी व वादळी वार्‍यासह बरसलेल्‍या या पावसामुळे रब्‍बी पिकांची अवस्‍था दयनीय झाली बसून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button