मी तोपर्यंतच नंदुरबारचा पालकमंत्री; नियुक्तीनंतर दुसर्याच दिवशी हसन मुश्रीफांकडून गौप्यस्फोट, जाहीर नाराजीने पदभार स्वीकारण्याबाबतही संभ्रम

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होऊन २४ तास उलटत नाही, तोच दुसर्याच दिवशी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दुसरा कुणी नेता जबाबदारी घेत नाही, तोपर्यंतच मी नंदुरबारचा पालकमंत्री म्हणून कार्यरत राहील, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
ॲड. माणिकराव कोकाटे हे याआधी नंदुरबारचे पालकमंत्री होते. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नंदुरबारचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. यानंतर बुधवारी (दि.१८) विशेष आदेश काढून हे पद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविले. मात्र, नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे त्यांच्या एका वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी एका बैठकीच्या वेळी मुश्रीफ यांनी ही बाब स्पष्ट केली. ‘माझी अडचण सुनील तटकरे यांना माहिती आहे. पण नव्यानेच उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांना या अडचणीची कल्पना नाही. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद माझ्याकडे सोपवले गेले. आता दिलेली जबाबदारी मी पार पाडणारच आहे. पण दुसरा कुणी नेता जबाबदारी घेत नाही, तोपर्यंतच मी नंदुरबारचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहे’, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुश्रीफ यांच्या या वक्तव्यावरून ते नंदुरबारच्या पालकत्त्वाची जबाबदारी घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुश्रीफ यांनी पालकमंत्री म्हणून अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारण्याआधीच असे वक्तव्य केल्याने अवघ्या काही तासांतच जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले जातात की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर नंदुरबारचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. तेव्हापासून म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्तच होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे यावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) असल्याने आता चार महिन्यांनंतर हे पद याच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आले. पण त्यांनी आता हे पद स्वीकारण्यात फारशी उत्सुकता न दाखवल्याने भविष्यात हे पद राष्ट्रवादीकडे राहणार की शिवसेनेकडे जाणार, अशी शंकाही निर्माण होऊ लागली आहे.



