वनविभागाला ‘टीप’ दिल्याच्या रागातून आरोपीकडून एकावर चाकूहल्ला; गालच कापला, अक्कलकुवा तालुक्यातील धक्कादायक प्रकार

मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एका गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीने आपले नाव गुजरात वनविभागाला का कळवले, असा जाब विचारीत एकावर थेट चाकूने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथे बुधवारी भल्या सकाळी घडली. या प्रकरणी संबंधित आरोपीवर मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैती चांधा वळवी (रा. जांगठी, ता. अक्कलकुवा) असे आरोपीचे तर गुलाबसिंग डेबन्या वसावे (३५, रा. मनीवेली, ता. अक्कलकुवा) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका प्रकरणात जैती वळवी याचा गुजरातच्या वनविभागाकडून शोध घेतला जात होता. याचदरम्यान गुलाबसिंग वसावे यानेच आपले नाव गुजरातच्या वनविभागाच्या कर्मचार्यांना कळविल्याची शंका त्याला होती. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुलाबसिंग वसावे हा पत्नीसोबत जांगठी गावातील मुंगीबाई दिलवरसिंग वळवी यांच्या घरासमोरून जात होता. याचवेळी जैती वळवी याने त्याला गाठून जाब विचारीत त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात जैती याच्या डाव्या गालावर चाकूने मोठी जखम झाली.
जैती वळवी याच्या तक्रारीवरून गुलाबसिंग वसावे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वनसिंग पाडवी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



