एकाची सून दुसर्याच्या मुलासोबत पळाली, दोन्ही कुटुंब तडजोडीला बसले अन् परस्परांवर तुटून पडले, अक्कलकुव्याच्या वेली मांडा आंबापाडात चालल्या लाठ्याकाठ्या, पाच गंभीर जखमी

मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विवाहितेच्या पलायन प्रकरणात नंतर तडजोड सुरू असताना दोन्ही कुटुंबात वादावादीचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाल्याचा गंभीर प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील वेली मांडा आंबापाडा येथे घडली. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकूण तीन जणांवर मोलगी पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील जमाना गावातील एक महिला वेली मांडा आंबापाडा येथील जितेंद्र कालुसिंग वळवी याच्यासोबत काही दिवसांपूर्वी फरार झाली होती. काही दिवसांनी हे जोडपे वेली मांडा आंबापाडा येथे परतले. या प्रकरणात बुधवारी (दि. १७) पंचासमक्ष तडजोड करून सदरील महिलेला परत घेऊन जाण्यासाठी तिच्या कुटुंबातील काही जण वेली मांडा आंबापाडा येथे आले होते. तर जितेंद्र पाडवी यांच्या वतीने त्याचे आई-वडिल या बैठकीस बसले होते. तडजोडीच्या अनुषंगाने चर्चा सुरू असतानाच दोन्ही कुटुंबांमध्ये काही तरी मुद्यावरून वाद झाला. काही क्षणातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी कालुसिंग फत्या वळवी याने सदर महिलेच्या नातेवाईकांना शिविगाळ करीत त्यांच्यावर लाकडी डेंगार्याने हल्ला चढविला. यात फिर्यादी मगन रायजा तडवी, रामा सिंगा पटले, अक्षय भगतसिंग राऊत हे तिघे जखमी झाल्याची फिर्याद मगन तडवी याने दिली. यावरून कालुसिंग फत्या वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर त्याचवेळी कालुसिंग वळवी याची पत्नी लिलाबाई वळवी यांनीही विरोधी गटातील दिलीप उर्फ दिपला कर्मा पाडवी आणि दिनेश उर्फ दिन्या दिलीप पाडवी या दोघांविरोधात फिर्याद दाखल केली. यात या दोघांनी आपल्यासह पती कालुसिंग वळवी याच्यावर लाकडी डेंगार्यासह दगडाने हल्ला करून जखमी केल्याचे लिलाबाई वळवी यांनी या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप चौरे व पितांबर जगदाळे करीत आहेत.



