नवापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात २०.५० लाखांचा महाघोटाळा; निवृत्त कृषि उपसंचालक चौधरी, कर सल्लागार कोठावदेची मिलिभगत, संगनमताने जीएसटीच्या रकमेवर डल्ला

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूरच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तत्कालिन तालुका कृषि अधिकारी वसंत चौधरी व कर सल्लागार राकेश कोठावदे या दोघांनी मिलिभगत करून कार्यालयातील कामापोटी भरावयाच्या वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) तब्बल २० लाख ५० हजार १४८ रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्याचे उघड झाले असून, आता या दोघांवरही नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी हे काही महिन्यांपूर्वीच कृषि उपसंचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच कोठावदे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत धर्मराज चौधरी (निवृत्त कृषि उपसंचालक (आत्मा), रा. प्लॉट नं. ३८, गिरीकुंज हाऊसिंग सोसायटी, आधार हॉस्पिटलजवळ मार्केट रोड, नंदुरबार) आणि राकेश भालचंद्र कोठावदे (कर सल्लागार, रा. प्लॉट नं. २०१, स्वामी विवेकानंद चौक, नवापूर, जि. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत.
असा केला घोटाळा
वसंत धर्मराज चौधरी हे २०१८ ते २०२० या कालावधीत नवापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात तालुका कृषि अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत या कार्यालयामार्फत मृद व जलसंधारणाची काही कामे करण्यात आली होती. या कामांपोटी शासन निर्णयानुसार शासनाकडे वस्तू व सेवा कराचा भरणा करणे आवश्यक होते. चौधरी यांनी कोठावदे यांना तालुका कृषि कार्यालयाचा ३० लाख ३३ हजार १७० रुपयांचा धनादेश देऊन जीएसटीचा भरणा करण्यास सांगितले. मात्र, कोठावदे याने त्यातील केवळ ९ लाख ८३ हजार ०२२ रुपयेच इ–पेमेंटद्वारे जीएसटी पोटी शासनाकडे भरले. उरलेली २० लाख ५० हजार १४८ रुपये या दोघांनी लबाडीच्या उद्देशाने कपटकारस्थान कचून स्वत:च्या खिशात घातले.
मयताच्या नावावर घोटाळा खपवण्याचा प्रयत्न
घोटाळ्याची २०.५० लाखांची रक्कम हडपल्यानंतर या दोघांनी हा घोटाळा भविष्यात उघड होऊ नये, यासाठी आणखी एक कट रचला. कोठावदे याने जीएसटीची उरलेली २० लाख ५० हजार १४८ रुपयांची रक्कम याच कार्यालयातील (तालुका कृषि अधिकारी कार्यालय) मयत लिपिक किरण झिंगा कन्हैय्या यांना ते जिवंत असताना व्हाऊचरच्या माध्यमातून परत दिल्याचे दाखवले. याचा पुरावा दाखवण्यासाठी कोठावदे याने व्हाऊचर देखील तयार केले होते. हद्द म्हणजे यावर त्याने या व्हाऊचरवर रक्कम मिळाली म्हणून किरण झिंगा कन्हैय्या यांच्या खोट्या स्वाक्षर्याही केल्या होत्या. मात्र, हे व्हाऊचर आणि त्यावरील खोटे व बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
…आणि गुन्ह्याची नोंद
वसंत चौधरी आणि राकेश कोठावदे यांचा बनावटपणा, लबाडी, कटकारस्थान चौकशीत उघड झाल्यानंतर नवापूरचे सध्याचे तालुका कृषि अधिकारी रविशंकर गेमसिंग पाडवी (५४, रा. ढाळीआंबा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) यांनी नवापूरचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व उपनिरीक्षक अभिजित अहिरे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यानंतर पाडवी यांच्या तक्रारीवरून वसंत चौधरी व राकेश कोठावदे यांच्यावर शासनाची फसवणूक व लबाडी केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहेत.



