आता रंगणार ग्रामीण राजकारणाचा आखाडा : ६७ ग्रामपंचायतींतील १० सरपंच, ७० सदस्यांच्या रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रणरणते उन वाढत असतानाच आता याच उन्हाळ्यात नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणाचा आखाडाही तापणार आहे. जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींतील १० सरपंच व ७० सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींतील रिक्त जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असून, त्याचा निकाल दुसर्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमधील ३ सरपंच व ९ सदस्य, अक्राणीतील ९ ग्रामपंचायतीतील २ सरपंच व ७ सदस्य, तळोदातील ७ ग्रामपंचायतीतील ८ सदस्य, शहादातील १५ ग्रामपंचायतीतील १ सरपंच व २० सदस्य, नंदुरबारमधील ७ ग्रामपंचायतीतील १ सरपंच व ८ सदस्य, नवापूरमधील १८ ग्रामपंचायतीतील ३ सरपंच व १८ सदस्यांची या निवडणुकीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
या गावांना मिळणार नवा सरपंच
जिल्ह्यातील दहा गावांतील सरपंचपद विविध कारणांनी रिक्त झाले आहे. यातील पाच सरपंचांना गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले होते. तीन गावांच्या सरपंचांचे निधन झाल्याने तर दोन ठिकाणी सरपंचांनी राजीनामा दिल्याने तेथील सरपंचपद रिक्त झाले आहे. सरपंचपदाची निवडणूक जाहीर झालेल्या गावांमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर, कोराई, बिजरीगव्हाण, अक्राणी तालुक्यातील डोमखेडी, शहादा तालुक्यातील सोन बु. बिलाडी तह, नंदुरबार तालुक्यातील सातुर्ख, नवापूर तालुक्यातील खांडबारा, बिलबारा, खातगाव यांचा समावेश आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची तारीख : ७ ते १३ एप्रिल २०२६
नामनिर्देशन पत्रांची छानणी : १५ एप्रिल (सकाळी ११ वाजता)
अर्ज मागे घेण्याची मुदत : १७ एप्रिल २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
मतदानाची तारीख : २८ एप्रिल २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
निवडणुकीचा निकाल : २९ एप्रिल २०२६



