अक्कलकुव्यातील ‘जीवा-शिवा’च्या जोडीला मिळाले सर्वाधिक ८० हजारांचे मोल!; खरेदीदारांच्या उत्साहाने तळोद्याच्या बैल बाजाराला ‘चार चाँद’!

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहुर्तावर सुरू झालेल्या तळोद्यातील कालिकामाता यात्रोत्सवावात भरलेला बैल बाजाराला खरेदीदारांच्या उत्साहाने चार चाँद लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत या बाजारात सातशेहुन अधिक बैलांची विक्री झाली असून, त्यातून सव्वा कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. महत्वाचे म्हणजे या बाजारात डेटका रूमा वळवी (रा. वेली, ता. अक्कलकुवा) यांच्या बैलजोडीला तब्बल ८० हजार रुपयांचे मोल मिळाले. बिजरेश रमाकांत सावंत (रा. खोडामळी, ता. नंदुरबार) यांनी ही बैलजोडी खरेदी केली.
तळोदा शहरात कालिका मातेचा यात्रा भरली असून, बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत बैल खरेदी-विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होत असते. दरवर्षी अनेक शेतकरी आपल्या बैलजोड्या याठिकाणी विक्रीस आणतात. आठ ते दहा दिवस चालणार्या या यात्रेच्या पहिल्याच दिवशी ७०० पेक्षा अधिक बैल विक्रीसाठी आणले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत दीड पट म्हणजेच दीड कोटींच्या वर उलाढाल होण्याचा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव हेमंत चौधरी यांनी व्यक्त केला. अर्थात, दरवर्षीप्रमाणे यंदा पहिल्या दिवशी एक कोटीचा आकडा पार होऊ शकला नसला तरी दुसऱ्या दिवशी मात्र हा आकडा गाठला गेला. त्यामुळे यंदा यात्रेत चांगलीच तेजी असल्याचे बोलले जात आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही तळोदा बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्डात हा बाजार भरवण्यात आली आहे. सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील बैलांसह गुजरात आणि मध्यप्रदेशासह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावठी व ठेलारी प्रजातीच्या बैल याठिकाणी विक्रीस दाखल झाले आहेत. बैलबाजारात पहिल्या दिवशी ७०० तर दुसऱ्या दिवशी २०० हून अधिक अशी एक हजार बैलांची अंदाजित आवक झाली होती. हा सिलसिला काल तिसर्या दिवशीही सुरू राहिला. या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन बाजार समितीला जवळ पास सव्वा लाखांच्या वर महसूल प्राप्त झाला आहे. या बाजारात १९ एप्रिलला ४०० बैलांची विक्री होऊन त्यातून ६० लाखांची, तर २० एप्रिलला २०० बैल विकले जावून त्यातून ४० लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती देण्यात आली.
बैलबाजारानिमित्त इतर पूरक व्यावसायिकांनीही याठिकाणी हजेरी लावली आहे. यात चारा, बैलांना लागणाऱ्या दावन, दोर, काठ्या खूळ, आदींसह शेतीउपयोगी साहित्य आदींचा समावेश आहे.. बाजाराच्या यशस्वीतेसाठी सचिव सुभाष मराठे, सहायक सचिव हेमंत चौधरी, लेखापाल प्रसाद बैकर, निरीक्षक संजय कलाल, अजय चव्हाण, जयेश सूर्यवंशी, राहुल जावरे, धनराज मराठे, हितेश धानका, संदीप उदासी, कृष्णा मराठे, शिवाजी पाटील आदी परिश्रम घेत आहेत.



