नंदुरबार जिल्हा

अनुसूचित जाती आरक्षणाच्‍या उपवर्गीकरणातून आरक्षण संपविण्याचे केंद्र, राज्‍य सरकारचे षडयंत्र; शहाद्यात आंबेडकरी अनुयायांचा एल्गार

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घालून केंद्र व राज्य सरकार घटनादत्त आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप शहादा येथे आयोजित आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले स्मारक स्थळी विविध पक्ष, संस्था आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करतानाच यासंदर्भात स्थापन केलेल्‍या ‘आरक्षण जनजागृती समिती’मार्फत शासनाला लेखी निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपस्थितांनी उपवर्गीकरणाच्या तांत्रिक आणि घटनात्मक बाबींवर प्रकाश टाकला.
आरक्षणाचा पाया महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी घातला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानिक दर्जा दिला. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ते प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे साधन आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले. भारतीय संविधानातील कलम ३३०, ३३२, १६ (४) आणि ३३५ नुसार अनुसूचित जातींना एकसंघ आरक्षण प्राप्त आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निकालानंतर राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार देण्यात आले आहेत. हे उपवर्गीकरण संवैधानिक नव्‍हे तर ‘वैधानिक’ स्वरूपाचे आहे. ही बाब भविष्यात आरक्षणाची मूळ संकल्पनाच मोडीत काढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली.
बैठकीत उपवर्गीकरणाच्या संभाव्य परिणामांची आकडेवारी मांडण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातीच्या १३ टक्‍के आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्‍यास त्याचा फटका सर्वच उपजातींना बसणार आहे. उपवर्गीकरणामुळे जाती-जातींमध्ये कप्पे तयार होतील. एखाद्या जातीत क्षमता असूनही त्यांना ‘कोटा’ संपल्यामुळे संधी नाकारली जाईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाची प्रगती खुंटणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या माजी न्यायाधीश अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल शासनाने सार्वजनिक न करता थेट हरकती मागवल्या आहेत, यावर बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अहवालात चुकीची आकडेवारी असण्याची शक्यता असून, तो अहवाल तातडीने जनतेसमोर ठेवावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी अनिल कुवर, प्रा.देवेंद्र निकम, भरत नगराळे, संजय खंदारे, सुरेंद्र कुवर, प्रशांत निकुंभ, राजेंद्र गुलाले, किरण मोहिते, नरेंद्र महिरे, अॅड. दिनेश महिरे, चंद्रकांत रायसिंग, डॉ.गौतम कुवर, विष्णू जोंधळे, संजय निकुंबे, छोटू कुवर, शांतीलाल महिरे, नरेंद्र कुवर, प्रा. नेत्रदीपक कुवर आदींसह आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button