धक्कादायक : भारतीय तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी; २४ पैकी दोन तास तोंड मोबाईलमध्ये खुपसलेलं; मुलांपेक्षा मुली ४७% अधिक सक्रीय; एआयचा वापर १०० टक्के वाढला!

मुंबई (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भारतीय तरुणाई सोशल मीडियाच्या पूर्ण आहारी गेली असून, १८ ते २४ वयोगटातील तरुणाईचा दिवसाच्या २४ पैकी तब्बल दोन तासांचा वेळ सोशल मीडियाच्या साईटस्वर जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यातही विशेष म्हणजे सोशल मीडियावर मुलांपेक्षा मुली ४७ टक्के अधिक सक्रीय असून, एआय ॲप्सच्या वापरात गेल्या काही दिवसांत शंभर टक्के वाढ झाली असल्याचे ही आकडेवारी सांगते.
आज जवळपास प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आले असून, बहुतेक लोक सोशल मीडिया वापरतात. यातूनच सर्वांना आश्चर्यचकित करणारी बाब एका नवीन अहवालातून समोर आली आहे. ताज्या अहवालानुसार, भारतातील मोठ्या शहरांत राहणारे १८ ते २४ वयोगटातील तरुण दररोज सरासरी किमान २ तास म्हणजेच १२० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. या वयोगटातील तरुण इतर सर्व वयोगटांतील लोकांपेक्षा खूप जास्त सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. हे प्रमाण एका सामान्य भारतीयाच्या सरासरी ९७.९ मिनिटांपेक्षा खूप जास्त आहे. साधारणपणे, एक सामान्य भारतीय दररोज फक्त सुमारे १ तास ३८ मिनिटे सोशल मीडियाचा वापर करतो.
व्हीटीयन (व्हीटीआयओएन) आणि इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) यांच्या एका अहवालानुसार, प्रत्येकजण सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा वापर एकाच प्रकारे करत नाही. तरुण, वृद्ध आणि अगदी पुरुष व महिलांसह विविध वयोगटातील लोकांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात. ते त्यांच्या पसंतीनुसार वेगवेगळे ॲप्स निवडतात आणि त्यांच्या वापराच्या पद्धतींमध्ये लक्षणीय विविधता आढळते. १८ ते २४ वयोगटातील तरुणाईकडे पाहिले असता या वयोगटातील मुली मुलांपेक्षा सोशल मीडियावर ४७ टक्क्यांनी अधिक सक्रिय असल्याचे आढळते.
सर्वात तरुण वयोगट सोशल प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय असून, ३५ आणि त्याहून अधिक वयाचे लोक मनोरंजन प्लॅटफॉर्मवर दिवसातील सरासरी ७७.२ मिनिटे वेळ घालवतात, असे हा अहवाल सांगतो. स्त्रिया या पुरुषांपेक्षा ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवतात, असेही या अहवालात नमूद केले आहे.
या अहवालानुसार, प्रमुख शहरांमधील २५-३४ वयोगटातील महिला ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दररोज सरासरी ३५.२ मिनिटे घालवतात. तर याच वयोगटातील पुरुष दररोज सरासरी २४.८ मिनिटे घालवतात. याचा अर्थ महिला पुरुषांपेक्षा ४२ टक्क्यांनी अधिक सक्रिय आहेत.
शिवाय, सोशल मीडियाच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली असून, यामध्ये १८-२४ वयोगटातील तरुणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. लोक दररोज मेसेजिंगवर ५८.६ मिनिटे घालवतात. कर्ज आणि क्रेडिट ॲप्ससारख्या विशिष्ट विभागांच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ॲप्समध्ये शंभर टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.



