आला पावसाळा, जीर्ण इमारती पाडण्याच्या इशार्याचा प्रशासनाकडून पुन्हा चाळा; १५४ जीर्ण इमारती पाडण्यासाठी मालकांना चारही पालिकांकडून नोटिसांचा सोपस्कार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा’, असा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासन आणि जीर्ण इमारतींचे मालक यांच्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या खेळाला यंदाही सुरूवात झाली आहे. पावसाळा उंबरठ्यावर येवून ठेपताच जिल्ह्यातील चारही नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीच्या प्रशासनांनी आपल्या हद्दीतील धोकादायक आणि जीर्ण इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावून या इमराती पाडून टाकण्याची सूचना केली आहे. अर्थात, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सदरील इमारतींच्या मालकांनी नेहमीच येणार्या या नोटिसांकडे तूर्त तरी दुर्लक्ष केल्याने आता नगर परिषदांचे प्रशासन नोटिसांत उल्लेखाप्रमाणे खरेच या जीर्ण इमारती पाडण्यासाठी स्वत: पुढाकार घेतात का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार नगर पालिका आणि धडगाव नगर पंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जीर्ण व धोकादायक इमारती असून, अनेक कुटुंब या इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून राहत आहेत. दरवर्षी पावसाळा उंबरठ्यावर येताच या इमारतींचा मुद्दा चर्चेत येतो. जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद विभागाच्या सूचनेनुसार नगर परिषदा संबंधित इमारतींच्या मालकांना पाडण्याच्या नोटिसा बजावतात आणि पुढे काय झाले कोणीच पाहत नाही. वर्षानुवर्षे हा खेळ सुरू असून, यंदाही या खेळाला नोटिसांच्या माध्यमातून पुन्हा सुरूवात झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरात सर्वाधिक ४५, नवापुरात ४४, शहाद्यात ३३, तळोद्यात ३१ तर धडगावमध्ये एक अशा जिल्ह्यात एकूण १५४ इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होतील, अशा अवस्थेत आहेत. पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच संबंधितांनी त्यांच्या जीर्ण व धोकादायक अवस्थेतील इमारती स्वत:हून पाडून टाकाव्यात. अन्यथा या इमारती पाडण्यासाठी पालिका स्वत: पुढाकार घेतील, अशा नोटिसा सर्वच पालिकांनी आपल्या हद्दीतील जीर्ण व धोकादायक इमारतींच्या मालकांना बजावल्या आहेत.
पुरे झाली औपचारिकता
दरवर्षी जिल्हाभरातील कोणत्या ना कोणत्या नगर पालिकांच्या हद्दीत जीर्ण इमारत पडते, असे आजवरचा इतिहास सांगतो. असे असताना दरवर्षी पालिका प्रशासन त्यांच्या शहरातील धोकादायक व जीर्ण इमारती पाडण्यासाठी संबंधित मालकांना नोटिसा बजावतात. असे असले तरी आजवर कोणत्याही पालिका प्रशासनांनी स्वत:हून या इमारती पाडण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आलेले नाही. असा पुढाकार घ्यायचाच नसेल तर नगर पालिकांचे प्रशासन ‘तुम्ही जीर्ण इमारत पाडा, नाही तर आम्ही पाडून टाकू’, अशा नोटिसा बजावतातच का, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा विचारला जावू लागला आहे. यंदा तरी या नोटिसा म्हणजे केवळ औपचारिकता ठरू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.



