कत्तलखान्यावरून नंदुरबार पालिकेत रणकंदन; भाजप-शिंदे गट भिडले; घोषणाबाजीने परिसरात तणाव, एमआयएम शिंदे गटाच्या साथीला उतरल्याने सार्यांच्या भूवया उंचावल्या

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शहरातील बंद असलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर पालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली.
विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी कत्तलखान्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. शहरात पुन्हा कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय स्थानिकांच्या भावना दुखावणारा असल्याचे स्पष्ट केले. यानंतर भाजप सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडत निषेध नोंदविला.
मात्र, हे आरोप नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी ठामपणे फेटाळून लावले. बंद कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने कत्तलीस परवानगी दिलेल्या प्राण्यांचीच कत्तल संबंधित कत्तलखान्यात करण्याबाबतचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. ठरावाचा संपूर्ण मजकूर न वाचता भाजपकडून नंदुरबारकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एमआयएम प्रस्तावाच्या बाजूने…
दरम्यान, या ठरावाला एमआयएमने पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नगरसेवक रफत सैय्यद यांनी कत्तलखाना हा कायदेशीर आणि प्रशासकीय विषय असल्याचे सांगत ठरावाला समर्थन दिले. तसेच विरोध करणाऱ्या भाजप नगरसेवकांनीही खरी परिस्थिती लक्षात घेऊन ठरावाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सभागृहातील वादविवादानंतर पालिका प्रवेशद्वारावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात आंदोलन केले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कत्तलखान्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला हा वाद आता राजकीय रंग घेत असून, आगामी काळात हा मुद्दा नंदुरबारच्या स्थानिक राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेच्या सभेत झालेल्या या घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे.



