महाराष्ट्र

बचतीच्‍या माध्‍यमातून नंदुरबारकरांनी केली १.१२ कोटींची कमाई; महावितरणच्‍या प्रॉम्‍प्‍ट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीन योजनांचा घेतला लाभ

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘आजची बचत ही उद्याची कमाई’, ही उक्‍ती प्रत्‍यक्षात अंमलात आणत नंदुरबार जिल्‍ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्‍या विविध सवलत योजनांचा लाभ घेत तब्‍बल १ कोटी १२ लाख ३५ हजार ८१३ रुपयांची बचत केली आहे. महावितरणच्‍या प्रॉम्‍प्‍ट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीन या योजनांच्‍या माध्‍यमातून नंदुरबारकरांनी हे पैसे वाचवले आहेत.
महावितरणने ग्राहकांसाठी वीजविषयक सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. या डिजिटल सेवांचा वापर वाढावा, यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महावितरणच्या जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी डिजिटल पर्याय अवलंबून व तत्पर वीजबिल भरणा करून सुमारे १० कोटी रुपयांची सवलत प्राप्त केली आहे.
महावितरणकडून ग्राहकांनी सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रक्कमेच्या (कर व शुल्क वगळून) जवळपास १ टक्का तत्पर बिल भरणा सवलत, डिजिटल पद्धतीने ऑनलाईन (नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट/कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट/यूपीआय इ. वापरून) वीजबिल भरल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के डिजिटल बिल भरणा सवलत व गो ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारून छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल घेतल्यास दरमहा १० रुपये सवलत दिली जाते. गो ग्रीनमध्ये नोंदणी केल्यानंतर वर्षाची १२० रुपयाची सूट ही एकरकमी दिली जात आहे.
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी मावळत्या आर्थिक वर्षात या तिन्‍ही सेवा मिळून एकूण ९ कोटी ९६ लाख ९४ हजार ५५१ रुपयांची सवलत मिळवली आहे. यात नंदुरबार मंडलातील ग्राहकांनी तत्पर वीजबिल भरणाच्‍या माध्‍यमातून ५९ लाख ६२ हजार २१८, डिजिटल बिल भरणा करून १७ लाख ८९ हजार ५०५ व तर गो ग्रीन पर्याय निवडून ३४ लाख ८४ हजार ९० रुपये सवलत मिळवली आहे. उर्वरित रक्‍कम ही जळगाव व धुळे परिमंडळातील ग्राहकांची आहे.
महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदवणे, नवीन वीजजोडणी  अर्ज, वीजभार व नाव बदलणे इ. सर्व सेवा महावितरण वेबसाईट, महावितरण ग्राहक मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून सुरक्षित, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत झाली आहे.  

सर्व ग्राहकांनी वीजबिलाचे ऑनलाईन व प्रॉम्प्ट पेमेंट करून व गो ग्रीनमध्ये नोंदणी करून घसघशीत सवलतींचा लाभ घ्यावा.
‍- आय.ए. मुलाणी (मुख्य अभियंता, महावितरण)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button