धडगावच्या वावीत ‘बीए पास’ बंगाली बोगस डॉक्टरचा जीवघेणा खेळ; प्रशासन झोपेत पण ’आदिवासी जनजागृती’ने केला पर्दाफाश, ५ वर्षांपासून गर्भवतींच्या ’डिलिव्हरी’ केल्याचा संशय

धडगाव (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगावच्या सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेतील उणिवांचा फायदा घेत एका बोगस डॉक्टरने अक्षरशः जीवघेणा खेळ मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वावी (ता. धडगाव) गावात ‘डॉक्टर’ म्हणून वावरणारा हा बीए उत्तीर्ण तरुण पाच वर्षांपासून आदिवासी बांधवांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आदिवासी जनजागृती टीमचे कार्यकर्ते राकेश पावरा यांनी या बनावट दवाखान्यावर धाड टाकत संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील बीवस बाला या तरुणाने वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना वावीमध्ये दवाखाना थाटला होता. तो वावी व परिसरातील पाड्यांमधील आजारी लोकांची तपासणी करीत होता. दुर्गम भागात आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने स्थानिक आदिवासी मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी त्याच्याकडे येत होते. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने वर्षानुवर्षे बोगसगिरी सुरू होती.
प्रसूती करीत असल्याचा गंभीर संशय
जनजागृती टीमने केलेल्या छाप्यात दवाखान्यातील परिस्थिती पाहून सर्वच थक्क झाले. तेथे मोठ्या प्रमाणावर प्रेग्नन्सी किट्स, वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या आणि वैद्यकीय साहित्य आढळले. या आधारे संबंधित बोगस डॉक्टर गर्भवती महिलांवर उपचार तसेच त्यांच्या प्रसूतीही करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा संशय खरा ठरल्यास ठरला, परिसरातील माता व बालमृत्यूच्या घटनांमागे या आडि अशा बोगस डॉक्टरांची मोठी भूमिका असल्याचे स्पष्ट होणार आहे.
कॅमेऱ्यासमोर कबुली
राकेश पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला असता सुरुवातीला बीवस बाला याने टाळाटाळ केली. मात्र, नंतर कॅमेऱ्यासमोर आपण केवळ बीए पदवीधर असल्याची कबुली दिली.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोग्य सेवा दुर्गम भागात पोहोचल्याचा दावा केला जात असताना, तब्बल पाच वर्षे असा बोगस दवाखाना सुरू राहणे ही चिंतेची बाब असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था, डॉक्टरांची कमतरता आणि देखरेखीचा अभाव यामुळेच अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान आता संबंधित बोगस डॉक्टरवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, परिसरातील सर्व बोगस दवाखान्यांची चौकशी करावी, दुर्गम भागात अधिकृत डॉक्टर व आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी जोर धरीत आहे. तसेच ही घटना केवळ एका बोगस डॉक्टरपुरती मर्यादित नसून, दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अधोरेखित करणारी आहे. योग्य वेळी कठोर पावले उचलली नाहीत, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वावी गावातील या दवाखान्यात पोहोचल्यावर अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक पद्धतीने उपचार सुरू असल्याचे दिसले. मोठ्या प्रमाणावर औषधसाठा आणि प्रसूतीसाठी वापरले जाणारे साहित्य पाहून धक्का बसला. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे जीव धोक्यात येतील.
– राकेश पावरा (आदिवासी जतजागृती टीम)



