मृत्यूशी झुंज संपली : ‘त्या’ अपघातातील जखमी ढंढाणेतील युवकाने तोडला दम; नंदुरबारमध्ये स्कुटीने उडवल्याने झाला होता गंभीर जखमी

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महिनाभरापूर्वी नंदुरबार शहरात स्कुटीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा अखेर सुरतमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चेतन सुनील गाभणे (२५) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून या प्रकरणी स्कुटीचालक देविदास रामचंद्र शेळके यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातात स्वतः शेळके हेही गंभीर जखमी झाले असून, त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी शहरातील जाणता राजा चौक ते कोकणी हिल या मार्गावर कल्याणेश्वर हॉटेलसमोर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चेतन गाभणे (रा. ढंढाने पोस्ट वावद, ता. व जि. नंदुरबार) याला स्कुटीने (एमएच ३९ एपी २१७६) जोरदार धडक दिली होती. यात चेतन याला शरीरावर तसेच डोक्याला जबर मार लागला होता. या अपघातानंतर चेतनला तातडीने आधी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी सुरतला नेण्यात आले होते. तेथे बरेच दिवस उपचारानंतर अखेर दहा दिवसांपूर्वी त्याची मृत्यूशी झुंज संपली.
सुरत येथील रुग्णालयाकडून सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर चेतनचे वडील सुनील बबन गाभणे यांच्या तक्रारीवरून स्कुटी चालक देविदास शेळके यांच्यावर हयगयीने वाहन चालवून चेतनच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २० एप्रिल रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या अपघातात देविदास शेळके (रा. श्रद्धा पार्क, कोकणी हिल, नंदुरबार) हेही जबर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भरत पवार हे करीत आहेत.



