जावयाचे संतापजनक कृत्य : पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून सासुरवाडीसह दोन घरे जाळली; धडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना!
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : माहेरी आलेल्या पत्नीला वारंवार विनंती करूनही परत सासरी पाठवत नसल्याच्या रागातून संतापलेल्या जावयाने टोकाचे पाऊल उचलत थेट सासुरवाडीसह दोन घरे जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा येथे घडला. या आगीत सासरे डुमडा भायजा पाडवी आणि त्यांच्या शेजारी राहणारे सुभाष गिळ्या वळवी यांच्या घरासह संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले असून, आरोपी मिथुन भाईदास पाडवी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील खडक्याचा पाटील पाडा येथील मिथुन भाईदास पाडवी याचे लग्न काही वर्षांपूर्वी याच तालुक्यातील कुंडलचा मोहूपाडा येथील डुमडा बायजा पाडवी यांच्या मुलीशी झाले होते. मात्र, पतीशी पटत नसल्याने मिथुनची पत्नी आपल्या माहेरी परत निघून आली होती. यानंतर पत्नीला परत आपल्याकडे पाठवावे यासाठी मिथुन सासरे डुमडा पाडवी यांच्या मागे लागला होता. परंतु ते मुलीला परत पाठवण्यास तयार नव्हते.
वारंवार विनंती करूनही सासरे मुलीला आपल्याकडे परत पाठवत नसल्याने मिथुन संतापला. १६ एप्रिलला त्याने थेट सासुरवाडी गाठून कोणाला काही कळण्याच्या आतच डुमडा पाडवी यांच्या घराला आग लावून दिली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ही आग काही क्षणातच भडकली आणि त्यात डुमडा पाडवी यांचे घर भस्मसात झाले. त्यांच्या घरात साठवलेली १५ क्विंटल ज्वारी, ५० किलो तूर, इतर अन्नधान्य, लाकडी ढोल तसेच लाकडी दांड्या व कौलांच्या साह्याने उभारलेले घर या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात त्यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.
ही आग इतकी मोठी होती की तिने शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरालाही विळख्यात घेतले आणि त्यांचेही तांदूळ, ज्वारी, सेंट्रींग कामाचे सामान तसेच लाकडी दांड्या व कौलाच्या साह्याने उभारलेले घर जळून खाक झाले. यात त्यांचेही ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोन्ही घरे आगीच्या बक्षस्थानी पडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगावचे पोलीस निरीक्षक राजन मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी लिलाबाई डुमडा पाडवी यांच्या फिर्यादीवरून त्यांचा जावई मिथुन भाईदास पाडवी याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर मिथुन पाडवी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



